जनार्दन भेरे भातसानगर : पावसाळा तोंडावर आला असला, तरी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई काही थांबण्याचे नाव घेत नाही. तालुक्यातील तब्बल सव्वादोनशे गावपाडे टंचाईच्या खाईत असून केवळ एकदोन दिवसाआड मिळणाऱ्या टँकरच्या पाण्यावर त्यांचा रोजचा गाडा हाकण्याचा प्रवास सुरू आहे.
तालुक्यातील मासवणे ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली हे तब्बल ६०० ते ७०० लोकसंख्या असलेले गाव असून या गावासाठी लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणीयोजनेचे काम सुरू असून ती अजूनही पूर्ण झालेली नाही. गावात असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठला असल्याने नागरिकांची पाण्यावाचून मोठी समस्या निर्माण झाली आहे.
या नागरिकांनी जांभे नदीपात्रात खड्डा खोदून आपली तहान भागवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला, तरी तेही पाणी पुरेसे नसल्याने ग्रामस्थांनी टँकरने पाणी पुरवण्याची मागणी तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्याकडे केली आहे.या गावाला याआधी कधी नव्हे ती टंचाई निर्माण झाली आहे. जांभे नदीला पाणी आल्यानंतर गावाची तहान भागली जाते. त्यामुळे या गावासाठी लिफ्ट इरिगेशनद्वारे सिंचन योजना राबवण्यात येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत ती पूर्ण होऊन गावाला पाणी मिळण्याची आशा असली, तरी मात्र यावर्षी नागरिकांना थेट नदीपात्रातच खड्डे खोडण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावात गंभीर पाणीटंचाई असून नदीपात्रात खड्डे खोदून पाणी आणण्याची वेळ आली आहे . आम्ही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. - सोपान मोरे, ग्रामपंचायत सदस्य
तहसीलदारांकडे टँकरने पाणी पुरवण्याची मागणी केली असेल, तर ती लवकरच मंजूर होईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता