ठाणे : ठाण्यातील पोलीसभरतीमध्ये तोतयेगिरी करून घुसखोरी करू पाहणाऱ्या लहू राजू केसरकर याला राबोडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौकशी सुरूअसून आणखीही काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त संदीप पालवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २३८ जागांसाठी ४९ हजार ३२ जणांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. या भरतीस १२ मार्चपासून प्रारंभ झाला असून ती ४ एप्रिल २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे.रोज अडीच हजार जणांच्या गटाची शारीरिक तसेच कागदपत्रांची पडताळणी केली जाते. साकेत मैदान येथे सुरू असलेल्या या भरतीप्रक्रियेदरम्यान उमेदवारांची संपूर्णपणे बायोमेट्रीक तपासणी केली जाते. यात फोटो आणि बोटांचे ठसे घेतले जातात. त्यानंतर, उंची आणि छाती मोजली जाते. पात्र झालेल्या संबंधित उमेदवाराला त्याचा चेस्ट क्रमांक दिला जातो.शुक्रवारी भरतीप्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराची बायोमेट्रीक चाचणी झाली. त्याला आत प्रवेश दिल्यानंतर बॅग मागे राहिल्याचे कारण पुढे करून तो पुन्हा मागे आला. त्याचवेळी अन्य उमेदवाराने त्याच्या जागी शिरकाव केला. जो अन्य उमेदवार आत शिरला, त्याचे नाव लहू केसरकर असून तिथून निसटणाºयाचे नाव स्वप्निल जगताप असल्याची माहिती सीसीटीव्हीच्या पडताळणीतून चाणाक्ष पोलिसांनी उघडकीस आणली.केसरकर याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यात त्याचे नेमके आणखी कोणकोण साथीदार आहेत, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.
ठाण्यातील पोलीसभरतीमध्ये डमी उमेदवार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 2:46 AM