ठाणे : औरंगाबादमधील डम्पिंगला पेटलेला प्रश्न शमतो न शमतो तोच ठाणे जिल्ह्यातील डम्पिंगला लागलेल्या आगीमुळे लाखो नागरिकांचा जीव घुसमटतो आहे. कल्याणच्या आधारवाडीची आग कशीबशी शमू लागली आहे, तर दिव्यातील डम्पिंगची आग नव्याने भडकली आहे. त्याचवेळी भिवंडीच्या गायत्रीनगरचा कचराही पेटला आहे. उल्हासनगर, बदलापूरच्या डम्पिंगच्या दुर्गंधीचा प्रश्नही धुमसतो आहे.या सर्व ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रेंगाळला आहे. एकही महापालिका कचºयाचे नेमके वर्गीकरण करण्यात अपयशी ठरली आहे. ओल्या-सुक्या कचºयाबरोबरच मेडिकल वेस्ट, ई कचरा यांचेही आव्हान तसेच आहे.दिव्यातील डम्पिंगवरील कचºयाने बुधवारी रात्री पुन्हा मोठ्या प्रमाणात पेट घेतला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. गेल्या आठवड्यात ८ मार्चला येथे आग लागली होती. तेव्हा धुराचे प्रचंड लोट उठले होते. तेव्हापासून आग धुमसत असताना १४ मार्चच्या रात्री पुन्हा आग लागली. त्यामुळे दिवा परिसरात धूर पसरला आणि नागरिकांचा श्वास कोंडला. आग रौद्र रूप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्रिशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग विझवण्याचे काम मध्यरात्री तीन वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर, गुरुवारी सकाळी पुन्हा आग भडकल्यावर परत दोन गाड्या पाठवण्यात आल्या. दुपारनंतर पुन्हा अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी काम सुरू केले, पण अद्यापही आग आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.>भिवंडीतही कचºयामुळे धुराचे साम्राज्यभिवंडी : भिवंडीतील नागाव-गायत्रीनगरमधील डम्प्ािंगला बुधवारी रात्री लागलेल्या आगीने परिसरांतील नागरिकांचा श्वास कोंडला. या भागात मोठ्या संख्येने कामगार, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबे राहात असून त्यांना या धुरामुळे रात्रभर श्वास कोंडणे, दम लागणे, डोळ्यांची आग होणे असे त्रास सहन करावे लागले. वाºयामुळे हा धूर मैलभर अंतरावरील नागाव व आझादनगर या ठिकाणापर्यंत पसरला. डम्पिंग ग्राऊंड बंद करू, अशी आश्वासने देत येथील नगरसेवक निवडून येतात. पण येथील डम्पिंग गेल्या दहा वर्षांत हटलेले नाही. त्यामुळे विविध संघटनांनी हा विषय हाती घेत आंदोलने सुरू केली. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नसून अधिक चिघळल्याचे या आगीमुळे दिसून आले.भिवंडी पालिका क्षेत्रात १० ते १२ लाखांची वस्ती आहे. कापड कारखाने आहेत. येथे दररोज सुमारे ३५० मेट्रिक टन कचरा साठतो. त्यासाठी पालिकेमार्फत दरमहा एक कोटी ४० लाखापेक्षा जास्त खर्च होत असूनही प्रशासन व नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे गायत्रीनगरच्या डम्प्ािंगचा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने शहरातील ओला व सुका कचरा नेण्यासाठी ठेकेदार नेमले. पण त्यांच्याकडे वेगवेगळा कचरा गोळा करण्याची साधने नाहीत. त्यामुळे ठेकेदार घंटागाडीतून व कचराकुंडीव्दारे ओला व सुका कचरा एकत्र करून टाकतात. तो टाकण्यासाठी पालिकेकडे जागा नसल्याने नागाव-गायत्रीनगर येथील सीटी पार्कच्या जागेवर हा कचरा जमा केला जातो. त्यामुळे परिसरांत दुर्गंधी पसरली आहे. हे डम्प्ािंग बंद करण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन पुकारले होते. परंतु त्यावर पालिका प्रशासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही.
डम्पिंगचा भडका, दिव्यात धूर, भिवंडी परिसर घुसमटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 3:19 AM