लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात बुधवारी सायंकाळी मद्यधुंद डंपरचालक राम बिरेश सुखला वर्मा याने तब्बल १० वाहनांना धडक दिली. यात सर्व वाहनांचा चुराडा झाला. अपघात वाकस कशेळे येथे नाक्यावर झाला. अपघातात आठ दुचाकी आणि दोन चारचाकींचा समावेश आहे. अपघातात महिला जखमी झाली.
अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. डंपरचालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. कर्जत पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सायंकाळी ७ ते ७.१५ च्या सुमारास चालक राम बिरेश सुखला वर्मा हा डंपर घेऊन निघाला. त्याने प्रथम नेरळ-कशेळे राज्यमार्गावरील सुप्रिया हॉटेल येथे एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर पुढे वाकस येथे आणखी वाहनाला धडक देऊन पुढे निघून गेला.
नागरिकांकडून चोपकोठिंबे रस्त्यावर डंपर थांबला असता संतप्त नागरिकांनी या डंपरचालकाला पकडले तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले. नागरिकांनी चोप देत त्याला कर्जत पोलिस ठाणे अंतर्गत कशेळे पोलिस दूरक्षेत्र चौकीत पोलिसांच्या स्वाधीन केले. कर्जत पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.