कल्याण : दिव्यातील कचरा डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र, ते बंद करण्यासाठी त्या१४ गावातील भंडार्ली गावानजीक नवे डम्पिंग उभारण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. दिव्यातील अपयश झाकण्यासाठी ते केले जात असल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी १४ गाव संघर्ष समितीच्या बैठकीत केला.
कचऱ्याचे आंदोलन अधिक आक्रमक होईल. भंडार्ली गावात डम्पिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना कचऱ्यात टाकू. नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार केसेस करण्याची धमकी दाखवून डम्पिंग लादले जात असेल तर आमच्यावर केसेस झाल्या तरी चालतील. मात्र, ते होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
ठाणे शहरातील कचरा गावातील नागरिकांच्या माथी मारून त्यांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याची बाब संघर्ष समितीने नमूद केली आहे. काल १४ गाव संघर्ष समितीची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार पाटील उपस्थित होते.
....
निसर्गाच्या सानिध्यात डम्पिंग नको
मलंग गड हा सह्याद्रीचा फूटहिल्स समजला जातो. या फूटहिल्सपासूनच सह्याद्रीच्या पर्वत रांगांची सुरुवात होते. मलंग गडाच्या पायथ्याशी करवले गावात मुंबई महापालिकेने १०० एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी कचरा प्रकल्प तयार केला जाणार आहे. करवले गावाशेजारी असलेल्या उसाटणे गावानजीक १० हेक्टर जागेवर कचरा प्रकल्प उभारण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रयत्नशील आहे. करवले आणि उसाटणे गावांतील दोन्ही डम्पिंग ग्राऊंडला विरोध असताना आता भंडार्लीतील नागरिकांच्या माथी डम्पिंग मारून त्यांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. एकूण निसर्गाच्या सानिध्यातील गावांत डम्पिंग तयार करून गावे बकाल आणि प्रदूषित करण्याचा घाट घातला जात असल्याने त्याला विरोध केला जाईल, अशी या गावांतील नागरिकांची भूमिका आहे.
----------------------------------