उल्हासनगर : शहरातील खडी खदान डंपिंग ग्राउंडमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डंपिंगची राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात डंपिंगला आग लागल्याने परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होऊन हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष प्रधान पाटील यांनी दिली आहे.
या डंपिंगवर कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. उघड्या डंपरमधून कचरा घेऊन जात असल्याने डंपिंगकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला आहे. तसेच पावसाळ्यात डंपिंगच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. डंपिंग हटविण्यासाठी नगरसेवक व नागरिकांनी ठिय्या आंदोलन, उपोषण, धरणे आंदोलन केले.
डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी पाटील यांच्यासह सामाजिक संघटना, नगरसेवक, आदींनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. याबाबत राज्यमंत्री कडू यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून माहिती घेऊन कारवाईची मागणी केली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.