कल्याण : केडीएमसीच्या आधारवाडी डम्पिंगचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. क्षमता संपलेल्या डम्पिंग ग्राउंडवर महापालिकेने कचरा टाकणे सुरूच ठेवल्याने हा कचरा पसरल्याने हा रस्ताच बंद झाला आहे. एकीकडे घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा आयुक्तांनी उगारला असताना दुसरीकडे शहरात साचणारा कचरा टाकायचा तरी कुठे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.डम्पिंगला जाणारा रस्ताच बंद झाल्याने कचऱ्याच्या गाड्या डम्पिंगच्या पायथ्याशीच रिकाम्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे कचरा आणणाऱ्या वाहनांच्याही एकामागोमाग एक रांगा लागत असून या वाहनांतून कचरा डम्प करताना मोठ्या प्रमाणावर वेळ लागत आहे. कचरा सफाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना निर्माण झालेल्या कचरा समस्येवरदेखील ठोस उपाय आयुक्तांनी करावेत, अशी मागणी आहे. यासंदर्भात आयुक्तांशी संपर्क साधला असता तो झाला नाही.कल्याण-डोंबिवली शहरात प्रतिदिन ५५० टन कचरा गोळा केला जातो. आधारवाडी डम्पिंग येथे कचरा टाकला जात असला तरी त्याची क्षमता यापूर्वीच संपुष्टात आली आहे. घनकचऱ्यावर उचित कार्यवाही न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने केडीएमसी परिक्षेत्रात नवीन बांधकामास मनाई केली आहे. यावर, आधारवाडी डम्पिंग बंद करून उंबर्डे येथील आरक्षित जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय झाला असला तरी या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीला आधारवाडी डम्पिंगवरच तो टाकला जात आहे.
डम्पिंग ग्राउंड ओव्हर फ्लो : रस्ताही झाला बंद
By admin | Published: November 19, 2015 12:42 AM