ठाणे : ठाणे महापालिका, बिस्लेरी इंटरनॅशनल लिमिटेड, वॉटर फॉर चेंज आणि परिसर भगिनी विकास संस्थेच्या वतीने टाकाऊपासून टिकावू कसे करता येऊ शकते, याचे उत्तम उहादरण सर्वांसमोर सादर केले आहे. त्यानुसार टाकाऊ प्लास्टिकपासून त्यांनी प्लास्टिकचे बेंचेस तयार केले आहेत. त्याचा शुभारंभ मंगळवारी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांच्या हस्ते करण्यात आला.
ठाणे महापालिका हद्दीत वर्षाला २०० मेट्रिक टन प्लास्टिक गोळा केले जात आहे. ते माजिवडा ब्रिजखाली असलेल्या संकलन केंद्रात जमा केले जाते. तेथे काम करणाऱ्या संस्थेतील महिलांच्या माध्यमातून ते प्लास्टिक वेगळे केले जाते. सात प्रकारचे प्लास्टिक येथे येते. ते वेगळे करून त्यातून काय काय तयार करता येऊ शकते. याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर गुजरातमध्ये ते पाठविले जात असून त्याठिकाणी प्रक्रिया करून टाकाऊ पासून टिकावू वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यानुसार ठाण्याच्या सेवेत ४० किलोचा पहिला प्लास्टिक बेंच तयार केला असून त्याचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले की, हा एक चांगला उपक्रम असून प्लास्टिकचा देखील कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो, हे या निमित्ताने सर्वांना दिसत आहे. शहरात निर्माण होणारे प्लास्टिक गोळा करून त्यावर प्रक्रिया करून विविध वस्तू तयार करण्याचे प्रयोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हा बेंच ४० किलोंचा असून चॉकलेट रॅपरसह इतर प्लास्टिकचा वापर करून तो तयार केला असल्याची माहिती श्रेया सुधीर यांनी दिली. याच प्लास्टिक पासून आकर्षक लादी, इंटेरिअरच्या वस्तू देखील तयार केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.