लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवासेना सचिव ॲड. दुर्गा भोसले-शिंदे (वय ३०) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ ठाणे पोलिस आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात दुर्गा भोसले सहभागी झाल्या होत्या. मोर्चादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून ठाण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी निघालेल्या माेर्चात ॲड. दुर्गा भोसले-शिंदे घोषणा देत होत्या. यावेळी त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण रात्री उशिरा दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे. पेडर रोड येथील त्यांच्या घरी जाऊन गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आ. आदित्य ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले आहे. आमचा एक अत्यंत मेहनती युवासैनिक आम्ही गमावला आहे. युवासेना परिवाराला झालेला शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ओम शांती, अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
युवासेनेत हाेत्या सक्रिय
दुर्गा भोसले यांचे वडील काँग्रेस विचारधारेचे आहेत. मात्र दुर्गा यांनी २०१७ साली शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी मलबार हिलमधून महापालिका निवडणूकही लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्या युवासेनेत सक्रिय हाेत्या. २३ जानेवारी २०१८ झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दुर्गा भोसले यांना सचिवपद जाहीर करण्यात आले. लग्नानंतरही त्यांनी युवासेनेचे काम सुरूच ठेवले होते.