ठाणे : इतिहासकालीन हरिहर किल्ला येथे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, दुर्गभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यातून युवक, युवतींनी सहभाग घेतला होता.
नाशिक जिल्ह्यामध्ये त्रिंबकेश्वर डोंगर रांगेमध्ये निर्गुडपाडा गावाजवळ असलेला हरिहर किल्ला त्याला हर्ष गड असं सुद्धा संबोधले जाते. समुद्र सपाटीपासून ३६७६ फूट उंचीवर असणारा हा किल्ला , निर्गुडवाडी येथे उतरल्यावर किल्ला जरी समोर दिसत असला तरी तिथे जाण्याचा मार्ग हा अर्धवतुल पूर्ण करत करत जावं लागत. सुरवातीला चढायला सोप्पा आणि सरळ मार्गी असला तरी एकदा आपण मुख्य प्रवेश द्वाराच्या खाली आलो की पोटात मोठा गोळा येतो. सुरवातीला सोप्पा वाटणारा हा किल्ला ११० अंश सरळ असून एका वेळी एक जण चढू किंवा उतरू शकतो अशी याची रचना आहे. चढायला व उतरायला सोपं जावं यासाठी इतिहास काळातच आधीपासूनच पायऱ्यांना खड्डे तयार केलेले आहेत. प्रवेशद्वाराजवळ गेल्यावर पुढे किल्ला संपतो असं आपल्याला वाटतं पण समोर असणाऱ्या गुहे सारख्या मार्गातून पुढे-पुढे अंधारात गेल्यावर मोठं मैदान लागून तिथे पाण्याची १० ते १२ छोटी मोठी कुंड नजरेस पडतात. दगडांनी बनवलेली १० -१० ची एक अंधारमय शांत व थंडगार अशी खोली दिसते. या खोलीत जाण्या येण्याचा मार्ग म्हणजे एक छोटी खिडकी आहे. तिथे जर तितक्या आकाराचा छोटा दगड लावला तर बाहेरून दिसताना ती कोणाची समाधी असावी असे हुबेहूब दिसेल. अशा ह्या हरिहर गडावर काही तास घालवल्यावर तिथला निसर्ग पक्षांचा किलबिलाटाने व स्वराज्यातील गड किल्यांबाबत महाराजांचे धोरण या सगळ्यांच्या आपण प्रेमात पडल्यासारखे वाटते. या किल्यावर ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने स्वच्छता, दुर्गभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील युवक, युवतींना संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते, त्या नुसार या मोहिमेत निकिता मोकाशी, प्रज्ञा जाधव, मानसी मोरे, अश्विनी कुंभार, वैष्णवी परकाले, डॉ. वीरेंद्र परकाले, विशाल मोकाशी, नरेश देशमुख, अक्षय शिंदे, राजेंद्र मोकाशी, हर्षल चव्हाण, परेश वखारे, स्वप्नील चव्हाण, सचिन शिंदे, पराग भोईर, मारुती माने या युवक, युवतींनी मोहिमेत सहभाग घेतला होता. तर साडेपाच वर्ष वय असलेला रुद्र परकाले या लहानग्याने किल्याची कठीण चढाई चढत मोहिमेत सहभाग घेऊन मोहीम यशस्वी रित्या पार केल्याने ह्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. घनदाट जंगलामधून वाट काढत सुमारे अडीच तासभर हरिहर किल्यावर चढाई करत स्वच्छता मोहीम करण्यात आली तसेच गडकिल्याविषयी उपस्थित युवक, युवतींना प्रतिष्ठानच्या वतीने माहिती देण्यात आली. मोहीमेला विशेष सहकार्य ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड व नगरसेवक महेश साळवी यांनी केले होते. मोहीम यशस्वी करण्याकरिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनानुसार उपाध्यक्ष अमित मोकाशी, सचिव रोशन कदम, खजिनदार सुरज कदम, उपखजिनदार स्वप्नील लेंडे, सदस्य रोहित शिगवण यांनी विशेष मेहनत घेतली.