ठाणे : दुर्गाबाईनी त्यांच्या जीवनात सदैव बुद्धिनिष्ठ, परखड़ आणि सडेतोड़ भूमिका घेऊन त्यांचे लेखन केले व विचार मांडले, त्याचबरोबर उत्सुक अभ्यासू दृष्टिकोन जपला असे लेखन व असे लेखक हे एखादया कार्यक्रमाच्या कक्षेत बसवण खरतर खुप जबाबदारीचे व अवघड काम आहे. त्याचे लेखन हे आत्मनिष्ठ आणि स्वयप्रेरणेने तेजस्वी असते. एकेका शब्दाला मांडण्यात त्यांची जीवन निष्ठा आणि अभ्यासू मताचा कस लागलेला असतो.लोकरंजन किंवा वाचकाला भावेल अशी शैली किंवा भूमिका ते त्यांच्या लेखनात घेत नाहीत तर थेट मनाशी रोखठोक संवाद करतात अशा भावना ' तस्मैश्री 'हा दुर्गा भागवत ह्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रमात व्यक्त केल्या.
ह्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची होती. निर्मिती गौरव संभुस यांची असून कार्तिक हजारे निमंत्रक होते, क्षितिज कुलकर्णी, सुनीता फडके, अवधूत यरगोळे, मानसी जोशी, अश्विनी गोडसे, यांनी हा कार्यक्रम दिग्दर्शित केला असून, निवेदिका वासंती वर्तक, चित्रकार विजयराज बोधनकर, कवी रामदास खरे व अजेयचे कलाकार ह्यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केला. शब्द अभिनय, प्रस्तुतिकरण, अभिवाचन, लघुपट अशा विविध माध्यमातून हा प्रस्तुत झाला. कार्यक्रमात एक सुखद योगायोग घडला. दुर्गा भागवतांच्या मानसकन्या वासंतीका पुणतांबेकर कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.वासंतिका पुणतांमबेकर यांनी दुर्गाबाईंच्या काही साहित्याचा हिंदी अनुवाद केला आहे. दुर्गा भागवतांवरच्या संगीता धनुकटे ह्यांनी केलेल्या एका विडिओ क्लिप ने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मीनल दातार, निलीमा सबनीस, स्मृती म्हात्रे ह्यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. चित्रकार, कवी रामदास खरे ह्यांनी त्यांच्या पत्राला दुर्गाबाईंचे आलेले उत्तर ह्यावर त्यांचा लेख ' चविष्ट संवाद' सादर केला. दुर्गाबाईंच्या लोकसाहित्यविषयक संशोधनामधील ' हदग्याची किंवा भोंडल्याची गाणी' ह्या त्यांच्या लेखाचे मानसी जोशी ह्यांनी अभिवाचन केले आणि अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदूरकर, व एम.एच.स्कूल च्या विद्यार्थिनी भूमी संतोष बेंद्रे, मदिहा फातिमा इकबाल शेख, आर्या म्हात्रे, सिमरन परबळकर, आर्या लाटे, सोनल केरकर, संस्कृती भोजने ह्यांनी भोंडला सादर केला. त्यांच्या शिक्षिका सुनेत्रा मेस्त्री ह्यांनी मुलींची व्यवस्था पहिली. मो.ह.विद्यालयाच्या संगीत शिक्षिका सुनेत्रा सुपटकर ह्यांनी भोंडला बसवला होता. दुर्गा भागवत ह्यांच्या साहित्यात ' पैस ' हे पुस्तक मैलाचा दगड मानलं जातं. त्यातील पैशाचा खांब आणि गेंडा सूत्र ह्यावर डॉ.क्षितिज कुलकर्णी ह्यांचे अभिवाचन आणि अभिनव सावंत,पवन वेलकर ह्यांचे सादरीकरण रंगले. 'दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार, कार्य' ह्या पुस्तकातील मुद्दे घेऊन त्यावर स्वतःचा आजच्या पिढीचे विचार मांडणारा शोधनिबंध आयोजक कार्तिक हजारे ह्यांनी सादर केला. अंजली कीर्तने ह्यांच्या ' बहुरूपीणी दुर्गा भागवत - चित्र आणि चरित्र' ह्या पुस्तकाबद्दल कवी विकास भावे ह्यांनी विडिओ क्लिप च्या माध्यमातून संवाद साधला. सविता दळवी ह्यानी दुपानी पुस्तकावर विडिओ क्लिप दिली. लेखक,दिग्दर्शक आनंद म्हसवेकर ह्यांनी व्यासपर्व ह्या पुस्तकावर विडिओ क्लिप दिली. विचार संचित ह्या पुस्तकातून तयार केलेला शोध निबंध सलोनी बोरकर ह्यांनी सादर केला. सुनिता फडके ह्यांनी ऋतुचक्र मधील बारा महिने संकलित करून प्रत्येक महिन्याच्या सौंदर्याचा आणि वैशिष्ट्याचा अनुभव आपल्या वाचनातून प्रेक्षकांना दिला.
चित्रकार विजयराज बोधनकर ह्यांनी व्यासपर्वावर आधारित ' महाभारताचे मानसशास्त्र ' हे त्यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ह्यात महाभारतावरील त्यांच्या 10 चित्रांचाही समावेश केला होता. शिवानी गोखले, अश्विनी गोडसे, अवधूत यरगोळे ह्यांनी व्यसपर्वमधील कृष्ण द्रौपदी ह्यांच्या ' सख्यत्व' नात्यावरचे दुर्गाबाईंचे विचार सादर केले. निवेदिका वासंती वर्तक ह्यांनी दुर्गा भागवतांचे स्त्री मुक्ती विषयक विचार प्रेक्षकांसमोर तसेच परखडपणे मांडले. बाईंच्या कथा प्रांतातील 'एक प्राचीन कथा' ह्या कथेचं अभिवाचन स्वाती भट ह्यांनी लोकांसमोर मांडलं.पद्मा हुशिंग ह्यांनी ' चेहरा' ही कथा वाचली. डॉ.अनंत देशमुख ह्यांनी दुर्गा भागवतांच्या साहित्यातील आलेखावर विडिओ दिला. दुर्गा भागवतांच्या सर्व रुपांना कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अस्मिता चौधरी ह्यांच्या कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला. पाऊस असूनही वाचक रसिकांना कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.