कल्याण - मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील बदलापूर-वांगणी रेल्वेस्थानकांदरम्यान कासगाव, समर्थवाडी या रेल्वेस्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे.बदलापूर-वांगणी या दोन रेल्वेस्थानकांतील अंतर १२ किलोमीटर इतके आहे. बदलापूर ते वांगणीदरम्यान रेल्वेगाडीला १५ मिनिटांचा अवधी लागतो. रेल्वेच्या नियमानुसार चार किलोमीटर अंतरावर एक रेल्वेस्थानक हवे. रेल्वेमार्गाला समांतर असा कल्याण-कर्जत मार्ग आधीपासून आहे. या मार्गामुळे वांगणी व बदलापूरदरम्यानचा परिसर विकसित होत आहे. मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू असून वस्ती वाढत आहे. बदलापूर-वांगणीदरम्यान कासगाव, समर्थवाडी हे ठिकाण असून त्या ठिकाणी रेल्वेस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने स्वीकारला असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे.नागरीकरण व विकासकामाचा रेटा पाहता कल्याण-कसारा मार्गावरील गुरवली, कल्याण-कर्जत मार्गावरील अंबरनाथ-बदलापूर रेल्वेस्थानकांदरम्यान चिखलोली ही स्थानकेही मार्गी लागणार आहेत. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल यूपीए सरकारच्या काळात तयार आहे.सर्वेक्षणाचे आदेशकासगाव, समर्थवाडी रेल्वेस्थानकाच्या सर्वेक्षणाचे काम करण्याचे आदेश रेल्वेच्या संबंधित विभागाला दिले आहेत. वळण नसलेल्या मार्गावर नवे रेल्वेस्थानक उभारले जाईल. या स्थानकाला शेलू रेल्वेस्थानकाप्रमाणे थांबा असणार आहे. नव्या रेल्वेस्थानकामुळे चामटोली, कासगाव, देवळोळी, जांभळे, भुईसावरे, ढवळेपाडा आदी गावांसह अनेक आदिवासीपाड्यांना फायदा होणार आहे. या गावपाड्यांच्या विकासाला चालना मिळू शकते.
बदलापूर-वांगणीदरम्यान कासगाव रेल्वेस्थानक, प्रस्ताव स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:08 AM