लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या महिनाभरात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत दोन हजार १० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तर ६८ अट्टल गुन्हेगारांना तडीपार केले असून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४ दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, १० तलवारींसह बेकायदेशीररीत्या बाळगलेली ४९ हत्यारेही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.यात कलम १०७ नुसार १२३५ जणांवर, १०९ नुसार २५४ तर ११० नुसार ५२१ अशा दोन हजार १० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर ६८ अट्टल गुन्हेगारांना ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे या जिल्ह्यांमधून हद्दपार केले आहे. याव्यतिरिक्त ६५ जणांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव उपायुक्तांच्या कार्यालयात पाठविण्यात आले. आचारसंहिता २१ सप्टेंबर २०१९ पासून लागू झाल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांतील पोलीस ठाण्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व पथकांनी विशेष मोहीम राबवून या कारवाया केल्या.याशिवाय, बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-यांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून यात सात पिस्तूल, नऊ गावठी कट्टे, दहा तलवारी, २२ चॉपर आणि ३६ काडतुसांचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकांसह ठाणे पोलिसांनी एक कोटी पाच लाख ५६ हजार ४५० रुपयांची रोकड जप्त केली आहे. यात शांतीनगरमध्ये दोन लाखांची रोकड, कोनगावमध्ये तीन लाख ८५ हजार ८१० रुपये, मुंब्रा पोलिसांनी आठ लाख १० हजार रुपये, निजामपुरा दोन लाख ७४ हजार १४० रुपये, अंबरनाथ ९२ हजार ५०० रुपये, तर कासारवडवली पोलीस ठाण्यात अपक्ष उमेदवार रमेश कदम यांच्याकडून मिळालेल्या ५३ लाख ४६ हजारांच्या रोकडचा यामध्ये समावेश आहे.* दारूबंदीच्या २०४ कारवायायामध्ये दारूबंदीच्या सुमारे २०४ कारवायांमध्ये ८० हजार १६२ लीटर दारूसह तीन लाख ३६ हजार ६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थांच्या २४ कारवाया करून ९१ हजार ३०० चा सात किलो गांजा, तर पाच लाख ४५ हजार २३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.* आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४ दखलपात्र, तर आठ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये आठ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली आहे. आर्म अॅक्टचे २६ गुन्हे दाखल असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ नुसार १३ जणांविरुद्ध कारवाई केली आहे.
ठाण्यात आचारसंहिता काळात दोन हजार जणांवर कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: October 19, 2019 10:56 PM
निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राती ६८ अट्टल गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. तर सात पिस्तुलांसह ४९ बेकायदेशीर हत्यारे हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे४९ हत्यारे हस्तगत६८ अट्टल गुन्हेगार तडीपारएक कोटी पाच लाख ५६ हजार ४५० रुपयांची रोकड जप्त