ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 19 - दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेल्या क्रीडासंकुलातील तरण तलावात मनसेच्या वतीने बुधवारी महापौर चषक स्पर्धा घेण्यात आली. कोरड्या तलावात पोहणा-या मुलांना चषक देऊन मनसेने गौरवले. उन्हाळी शालेय सुट्टीच्या कालावधी तरण तलावाची दुरुस्ती हाती घेऊन मुलांच्या पोहण्याच्या आनंदावर पाणी फेरणा-या महापालिकेच्या निषेधार्थ मनसेने आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी केली.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेविका मंदा पाटील, मनोज राजे, राहूल चितळे, दीपाली पेंडणोकर, प्रमोद पोमेणकर आदी पदाधिकारी बच्चे कंपनीला साथ घेऊन बुधवारी सकाळीच क्रीडा संकुलाच्या तलावानजीक धडकले. यावेळी त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त होता.
तलावाच्या सुरक्षा रक्षकांनी तलावाच्या प्रवेशद्वाराला ताळे लावून घेतले होते. मनसे आंदोलकांना आत सोडण्यास नकार दिला. यावेळी मनसे कार्यकत्र्यानी लहान मुलांसह प्रवेशद्वारजवळच ठिय्या मांडला. ‘महापौर काका हाय हाय’, ‘आयुक्त काका हाय हाय’ अशी घोषणाबाजी मुलांनी सुरु केली. ‘महापौर व आयुक्त काका आम्हाला पोहायला द्या, नाही तर खुर्ची खाली करा’ अशी मागणी केली.
तरण तलावाच्या दुरुस्तीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी यापूर्वीही आंदोलन केले. तेव्हा त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा 12 कार्यकर्त्यांविरोधात केला होता, याची आठवण करुन उपाध्यक्ष कदम यांनी टाळे उघडा अन्यथा तोडून आत प्रवेश केला जाईल असा इशारा दिला.
त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी टाळे उघडून दिले. यावेळी तरण तलावाच्या ठिकाणी बच्चे कंपनीसह कार्यकत्र्यानी प्रवेश केला. लहान मुलांच्या तरण तलावात पूर्णपणे कोरडा होता. त्या तलवात मुलाना उतरविण्यात आले. कोरड्या तलावातच मुलांनी केवळ पोहण्याचा अभिनय केला. पोहण्याचे अभिनय करणा-या मुलांचा मनसेने चषक देऊन गौरव केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांनी सांगितले की, जलतरण तलवात सोडण्यात येणारे पाणी सातत्याने शुद्ध करावे लागते. जलशुद्धीकरणासाठी दोन पंप आहे. तसेच एक स्टॅण्डबाय पंप आहे. असे तीन पंप कार्यरत होते. त्यापैकी दोन पंप बंद पडल्याने त्याची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तसेच एक पाईप क्रॅक झाला आहे. त्यालाही दुरुस्त करावे लागणार आहे. पाणी शुद्ध केले नाही तर तरण तलवात पोहणा-यांना त्वचा रोग होऊ शकतात. अंगाला खाज सुटू शकते. गेल्या दोन वर्षापासून पंपाची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. हा इलेट्रीकल्स पार्ट असल्याने त्याची दुरुस्ती अत्यावश्यक होती. तरण तलावाला दररोज 30 लाख लिटर पाणी लागते. पाण्याची लेव्हल ठेवावी लागते. दुरुस्तीचे काम येत्या शनिवार्पयत पूर्ण करुन रविवारी तरण तलाव वापरासाठी खुला केला जाणार आहे. तरण तलावाचा लाभ घेणा-या सभासदांची संख्या 45क् इतकी आहे. अन्यही मुले आणि नागरीक तरण तलावाचा लाभ घेतात.
महापालिकेने डोंबिवली क्रीडा संकुलात उभारलेला अद्यावत तरण तलाव अनेक कारणावरुन गाजत आहे. तरण तलावाच्या ठेकेदाराने योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती न केल्याने त्याचा ठेका काही वर्षापूर्वी रद्द करण्यात आला होता. महापालिकेने ठेकेदाराची 33 लाखांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली होती. महापालिकेने हा तरण तलाव चालविण्यास घेतला. त्यानंतरही तरण तलावाच्या दुरुस्तीचे रडगाणो सुरुच आहे. तीन वर्षापूर्वी मनसेने डोंबिवलीचे तत्कालीन उपायुक्त दीपक पाटील यांना क्रीडाशून्य हा पुरस्कार देऊन गौरविले होते. मनसेने तरण तलावाची सुविधा नागरीकांना योग्य प्रकारे पुरविला जावी यासाठी कायम पाठपुरावा ठेवला आहे. प्रशासनाला जाग येत नसल्याने सत्ताधारी शिवसेना व भाजपच्या विरोधात आंदोलन करुन निषेध व्यक्त केल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.