ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशोब देण्याकरिता तीन दिवस निवडणूक आयोगाने निश्चित केले आहेत. खर्च निरीक्षकांनी प्रचार काळात दैनंदिन खर्चाचा हिशोब तीन वेळा तपासायचा आहे. निश्चित तारखांना उमेदवार, प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी केले.
ठाणे लाेकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षकांना हिशेब सादर करायचा आहे. त्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ४ थ्या मजल्यावर करमणूक कर शाखा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ९ मे, १३ मे व १८ मे या तारखांना उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेटून खर्चाचा हिशाेब सादर करता येणार आहे. यासाठी सर्व प्रकारच्या नोंदवह्या, देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी, ई-मेलने कळविण्यात येईल.
भिवंडीतील उमेदवार, प्रतिनिधींनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केलेल्या आवाहनानुसार भिवंडी महापालिका आयुक्त यांचा कॉन्फरन्स हॉल, तिसरा मजला, मनपा प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महापालिका, भिवंडी येथे खर्च तपासणीसाठी ९ मे, १४ मे, १८ मे या तीन दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान उमेदवार, प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कल्याण लाेकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सूक्ष्मा सातपुते यांनी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवार, प्रतिनिधींना दैनंदिन हिशाेब तपासणीसाठी ९ मे, १३ मे आणि १७ मे हे तीन दिवस निश्चित करून दिले आहेत.