लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने आता दसऱ्या मेळाव्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवतिर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिल्याने शिंदे गटाला धक्का बसला असला तरी देखील आता शिंदे गटाकडून मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी ठाण्यातील माजी नगरसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत. यात प्रत्येक नगरसेवकाला किमान पाच बस घेऊन येण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात बुधवारी महापालिका मुख्यालयात या माजी नगरसेवकांची एक बैठकही घेण्यात आली. त्यानुसार एकटय़ा ठाण्यातील ३५० च्या आसपास बस या मेळाव्याला जाणार असल्याचे दिसत आहे.
दसरा मेळाव्यावरुन सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटात शीतयुध्द सुरु आहे. शिवतिर्थावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही आग्रही असल्याचे दिसत आहे. मात्र आता ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा दसरा मेळावा मोठा व्हावा, त्याठिकाणी गर्दी व्हावी यासाठी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावर मोठी जबाबदारी आता येऊन ठेपली आहे. याच ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली होती. मात्र आता शिवसेनेत दोन गट झाल्याने हा बालेकिल्ला कोण ताब्यात घेणार यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत.
त्यातही शिंदे गटात शिवसेनेचे ६४ नगरसेवक सामील झाले आहेत. तसेच इतर पदाधिकारी देखील सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे पारडे जड झाले आहे. मात्र आपली ताकद प्रत्येक ठिकाणी सिध्द करण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दसरा मेळाव्याला अधिकची गर्दी जमविण्याचे काम याच ठाण्यातील शिलेदारांवर आले आहे. त्यानुसार शिवसेनेचे ठाणो जिल्हा प्रमुख तथा प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिंदे गटातील सुमारे ५० नगरसेवकांनी हजेरी लावली होती. या बैठकीत प्रत्येकला ५ ते ७ बस आणण्यास सांगितले आहे. त्यानुसार ३५० च्या आसपास बस आता या मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती सुत्रंनी दिली.
या मेळाव्याला ठाण्यातून किमान 3क् हजार पदाधिकारी, कार्यकर्ते आले पाहिजेत त्यादृष्टीनेही या बैठकीत मोर्चे बांधणी करण्यात आल्याची माहिती सुत्रंनी दिली. बस नसतील त्या उपलब्ध करुन दिल्या जातील, परंतु त्या भरुनच दसरा मेळाव्यासाठी आल्या पाहिजेच असेही सांगण्यात आले आहे.या संदर्भात प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला त्यांनी ही नियमित बैठक असल्याचे सांगितले. प्रभागात कशी कामे सुरु आहेत, याची माहिती यावेळी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.