कल्याण- कल्याण परिसरातील ढाब्यांवर अवैद्य मद्य विक्री होत असल्याप्रकरणी कल्याण उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल विविध ढाब्यांवर धाड टाकली. दहा ढाब्यांवर रात्रीत धाड टाकून केलेल्या कारवाईत विदेशी मद्य व दोन आरोपींना अटक केली आहे. कल्याण उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक देसले यांनी माहिती दिली की, एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत उत्पादन शुल्क विभागाने एकूण 49 ढाब्यांवर कारवाई केली आहे. अवैद्य मद्य विक्री करताना या ठिकाणी मद्य जप्त करण्याची कारवाई केली आहे. काल रात्री पुन्हा 10 ढाब्यांवर कारवाई केली. संजना, जय मल्हार, सिया गार्डन, हॉ शिकारा, दाजीबा, एकविरा, साई आंगन, साई उद्यान, फेण्डस्, चायनिज सेंटर या ढाब्यावर कारवाई केली आहे. त्या ठिकाणी दोन वारस मिळून आले आहेत. त्यांच्याकडून साडेपाच लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 4 हजार 210 रुपये इतकी आहे.उत्पादन शुल्क विभागाने कालच्या कारवाई आधी 11 नोव्हेंबरच्या रात्री देखील अशा प्रकारची धाड टाकून मिनाक्षी चायनिज, कोळीवाडा, एमएच डिरो फाईव्ह आणि एकविरा या चार ढाब्यावर कारवाई केली होती. त्याठिकाणी चार जणांच्या विरोधात अवैध मद्य विक्री प्रकरणी केसेस दाखल केलेल्या आहेत. साडेसहा लिटर विदेशी मद्य कारवाई दरम्यान जप्त केलेले आहे. त्याची किंमत 6 हाजर 733 रुपये इतकी आहे. कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत कल्याण शहर, पश्चिम भाग, कोनगाव, मुरबाड, शहापूर हा विभाग येतो. ढाब्यावरील अवैध मद्य विक्रीच्या विरोधात ही कारवाई अशाच प्रकारे सुरूच राहणार असल्याचे देसले यांनी सांगितले. कल्याण-भिवंडी, कल्याण मुरबाड, कल्याण शहापूर मार्गावरील तसेच कल्याण शीळ मार्गावर असंख्य ढाबे थाटले गेलेले आहे. एकूण ढाबे किती असतील त्याची काही संख्या उत्पादन शुल्क विभागाकडे नसली तरी अवैद्य मद्य विक्रीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाने त्यांची कारवाई तीव्र स्वरूपात सुरू केलेली आहे. रात्रीच्या वेळी या ढाब्यावर मद्य प्राशनाचा कार्यक्रम सुरू होतो. अनेक ढाबे अवैद्य मद्यविक्री करतात. हे ढाबे पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे या मार्गावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाई पश्चात ढाबेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याणमधील ढाब्यांवर उत्पादन शुल्क विभागाची धाड, दहा ढाब्यांवर केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 5:19 PM