कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी श्वेता सिंघासने यांचा डेंग्यूच्या तापाने शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कारक करण्यात आले.
सिंघासने या सोमवारपासून आजारी होत्या. त्यांना ताप येत होता. तापानंतर त्यांच्या आजाराचे निदान करण्यात आले. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्या अंबरनाथ येथे राहत होत्या. त्यांना उपचारासाठी प्रथम अंबरनाथ येथील खाजगी रुग्णालयात नंतर कल्याणच्या बड्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सिंघासने या महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत होत्या. त्यांनी काही काळ महापालिकेच्या फ प्रभाग कार्यालयाच्या प्रभाग अधिकारी पदाचा कार्यभार संभाळला होता. डें
ग्यूमुळे महापालिकेतील महिला अधिकारी सिंघासने यांचा मृत्यू झाल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. महापालिका हद्दीत डेंग्यूचे रुग्ण मिळून येतात. आरोग्यविषयी अनास्था असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य विषय काळजी घेतली जात नसल्याने नागरीकांचा डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता डेंग्यूचा बळी एक महिला अधिकारी झाली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, सिंघासने या अंबरनाथ येथे राहत असल्याने ही डेंग्यूची केस कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नाही, असं म्हंटलं. मात्र सिंघासने यांचा डेंग्यूने मृत्यू झाला असल्याचे खाजगी रुग्णालयाने महापालिकेस कळविले आहे.