लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजे २०२१-२०२२ या महसूली वर्षांपासून ७/१२ वर पिकांची नोंदणी फक्त मोबाइलमध्ये ''ई-पीक'' पाहणी ॲपच्या माध्यमातूनच करण्याचे धोरण कृषी व महसूल विभागाकडून सध्या राबवले जात आहे. याआधी तलाठी कार्यालयाकडून ''पीक पेरे'' म्हणून ही नोंद होत असे. पण, आता शेतकऱ्यांनी स्वतः शेतातून ही ''ई-पीक'' पाहणी मोबाइलद्वारे ऑनलाईन नोंदवायची आहे. परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना हे ॲप डाऊनलोड करण्यापासून तर त्यात कोठे पीक नोंद करावी याची काहीही माहिती नाही. त्यामुळे ही ई-पीक पाहणी शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे.
शेतकऱ्यांस शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲपमध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरायची आहे. या माहितीसह पिकाचा फोटो काढून ऑनलाईन या ॲपद्वारेच पाठवायची आहे. या वर्षापासून तलाठी कार्यालयामार्फत शेतातील या पीकपेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. परंतु, यासाठी शेतकरी ऑनलाईन साक्षर होणे आवश्यक आहे. त्यास यासाठी खास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अपेक्षित आहे. शेतकऱ्यांकडे फोन आहे. पण त्याचा वापर आजही बहुतांशी जण फोन करणे आणि आलेला फोन उचलणे एवढ्यापुरताच असल्याचे दिसून येत आहे.
या ॲपमध्ये पीकनोंदणी १५ सप्टेंबरपर्यंत करायची आहे, यानंतर ती होणार नाही, कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी सुरू होणार आहे. या एक महिन्याच्या कमी मुदतीमुळेही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी एका रजिस्टर मोबाइलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविता येत आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या मोबाइलवर आलेला चार अंकी ''ओटीपी'' हा शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पासवर्ड म्हणून निश्चित केलेला आहे. परत पीकनोंदणी करताना तो शेतकऱ्यांना पुन्हा वापरा लागणार आहे, आदींचे गांभीर्य आणि हाताळणीचे ज्ञान त्यांना मिळलेच पाहिजे, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.
--------