कर्जत: कर्जत शहर गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छतेबाबत देशात आघाडीवर असलेल्या शहरात गणले जाते आहे. पालिकेने कचरा उचलण्यासाठी स्वत:ची वाहने खरेदी केल्यानंतर आता एक पाऊल पुढे टाकत गल्लीबोळात कचरा उचलण्यासाठी ई-वाहने आणून ती समस्या सोडविली आहे. दरम्यान,अशा प्रकारे कचरा उचलण्यासाठी ई-वाहने वापरणारी कर्जत ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे.कचरा निर्मूलनाचे काम करून जगाचे लक्ष वेधणारे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कर्जत शहरात कचरा समस्या कायमची सोडविण्याचा निश्चय केला आहे. शहरात कचरा उचलण्यासाठी सहा घंटागाड्या कार्यरत असताना देखील तीवाहने जाऊ शकत नसलेल्या गल्लीबोळात कचरा तसाच पडून राहत होता. ही समस्या नगरपालिका अध्यक्षा रजनी गायकवाड,गटनेते राजेश लाड यांनी कशी सोडविता येईल याबाबत चर्चा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याशी केली. त्यानंतर कोकरे यांनी अनपेक्षित असे काम त्याबाबत करताना ई वाहने साकारली आणि कर्जतच्या गल्लीबोळात असणारा कचरा उचलला जाऊ लागला. ई वाहने यांच्या इंधनावर खर्च देखील करावा लागत नसल्याने पालिका प्रशासनाच्या खर्चात देखील कपात झाली आहे.या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केले. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, उपनगराध्यक्षउमेश गायकवाड आदी उपस्थित होते.ई-रिक्षा बहुपयोगी आहे, शहरातल्या अरुंद गल्ल्यांमध्ये वेगाने काम करते. भविष्यात अशा ई-रिक्षा वाढवण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे. या ई-कचरागाडीमुळे ग्रीन कर्जतचा नारा बुलंद होणार आहे.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी
कर्जतमध्ये कचरा उचलण्यासाठी ई-रिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 1:39 AM