ठाणे : ओला-सुका कचरा वेगळा करणे, जैविक कचऱ्यावर प्रक्रिया, लाकडापासून इंधन तयार करणे आदी विविध प्रकल्प पालिकेने हाती घेतले आहेत. आता ई-वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभागातून राबविण्यात येणार असून शहरात १०० स्पॉटवर कलेक्शनसाठी डबे ठेवले जाणार आहेत. सुरुवातीला पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर तो राबविला जाणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ६५० मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. परंतु, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेकडे आजही डम्पिंगची व्यवस्था नाही. परंतु, आता स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने शहरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, आता पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत ई-वेस्ट मॅनेजमेंट अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवणार असल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. खाजगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून येणाऱ्या संस्थेला शहरातील मुख्य १०० ठिकाणे दिली जाणार आहेत. त्या ठिकाणी १० फुटांपर्यंतचे डबे ठेवले जाणार असून ई-वेस्ट या डब्यात टाकावे, असे त्यावर नमूद करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)ई-वेस्ट विषयाची माहिती सर्वसामान्यांना करून देण्यासाठी पहिल्या वर्षी जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. त्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी साधारणपणे किती कलेक्शन होते, याचा अंदाज बांधला जाणार आहे. त्यानुसार, पालिकेला या प्रकल्पापासून उत्पन्नाचा किती हिस्सा मिळणार, हे निश्चित होईल.वार्षिक ३६ लाख किलो जमा : केंद्राकडून झालेल्या सर्व्हेत एक व्यक्ती वर्षाला २ ते अडीच किलो ई-वेस्टची निर्मिती करते. त्यानुसार, ठाणे शहराची लोकसंख्या आजघडीला १८ लाखांच्या आसपास असल्याने महापालिका हद्दीत वार्षिक सुमारे ३६ लाख किलो ई-वेस्ट जमा होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
ठाण्यात आता ई-वेस्ट मॅनेजमेंट
By admin | Published: November 10, 2015 2:14 AM