लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास उरले असताना प्रत्येक पक्षाने बहुमत मिळण्याचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यास सुरूवात केली आहे. आमचा महापौर होईल, असे सांगण्यासही नेते विसरलेले नाहीत. निवडून आल्यावर- सत्तेत सहभागी झाल्यावर विकास करू. प्रत्येक प्रभागात काम करू, असा दावाही त्यांनी केला. भाजपाचा २५ चा दावाआमच्या २५ जागा येतील. आम्ही आणि आमचे सहकारी मिळून सत्ता स्थापन करू, असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला. काही प्रभागात मतदारांनी थेट पॅनेललाच मतदान केले आहे. भाजपा सरकारने आतापर्यंत ज्या योजना राबविल्या, त्याचा फायदा नागरिकांना झाला. त्याचे प्रतिबिंब निकालात पडलेले दिसेल. शहरातील आणि प्रभागातील समस्या भाजपा सोडविणार असल्याचा विश्वास मतदारांना वाटल्याने त्यांनी आम्हाला मतदान केल्याचा दावाही पाटील यांनी केला. काँग्रेसची अपेक्षा ४० चीकाँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब गुड्डू खान यांनी सांगितले, आम्ही स्वतंत्रपणे लढल्याने आम्हाला ४० जागांवर विजय मिळेल. आतापर्यंत आम्ही विरोधात राहून नागरिकांसाठी मेहनत घेतली. पण कोणार्क आघाडी मतदारांच्या मानातून उतरली आहे. कोणार्कमुळे पालिका कर्जात बुडाली. त्यामुळे मतदारांना पर्याय हवा होता. तो आमच्या रूपाने त्यांना मिळेल, असा विश्वास आम्ही देऊ शकलो. काँग्रेस हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने मतदारही आमच्यासोबत आहेत, असे म्हणणे त्यांनी मांडले. शिवसेनेचा २५ जागांचा दावाशिवसेनेला २० ते २५ जागा मिळतील, असा दावा शिवसेनेचे शहरप्रमुख सुभाष माने यांनी केला. विकासकामे, वेगवेगळे प्रकल्प, आमदारांचे काम, यामुळे सनेचा जनाधार वाढला. त्याचा फायदा होणार असल्याचा दावा माने यांनी केला. मागील निवडणुकीपेक्षा सेनेच्या जागा वाढतील, असे ते म्हणाले.कोणार्कला १४ जागांची अपेक्षा भाजपाशी समझोता केलेल्या कोणार्क विकास आघाडीला १४ जागा मिळतील, असा दावा विलास पाटील यांनी केला. श्रमजीवीही आमच्यासोबत आहे. भाजपाने सोळा ठिकाणी उमेदवार न दिल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणार्कच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्याचाही कोणार्कला फायदा मिळेल, असे मत त्यांनी मांडले. निकालानंतरही कोणार्क भाजपासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीचा १५ चा दावाआमच्या १५ जागा निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी केला. आम्ही पॅनलमध्ये भक्कम उमेदवार दिल्याने मतदारांना आमच्याविषयी विश्वास निर्माण झाला. त्यामुळे यापेक्षा जास्त जागा वाढण्याची शक्यता आम्हाला वाटते. आम्ही समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याची निर्णायक भूमिका घेतल्याचाही आम्हाला फायदा झाला. मतांची विभागणी टळली. त्यामुळे अमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. समाजवादीला १८ ची अपेक्षासमाजवादी पक्षाचे प्रदेश सरचटिणीस अजय यादव यांनी पक्षाच्या १६ ते १८ जागा निवडून येतील असा दावा केला. आम्ही उभी केलेली संपूर्ण पॅनल निवडून येतील, असा दावा करतानाच राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने प्रभागातील उमेदवार कमी झाले व कार्यकर्त्यांत वाढ झाल्याचे मत त्यांनी मांडले. लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणीप्रभागांचा विकास घडलेला दिसेल, असा दावाही त्यांनी केला.
प्रत्येक पक्षाचा सत्तास्थापनेचा दावा
By admin | Published: May 26, 2017 12:15 AM