डोंबिवली – वारंवार पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अधिकारी वर्ग पावले उचलत नाही. खासदार निधीतून डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जागा उपलब्ध करून दिली जात नाही, अशा विविध प्रकारच्या अडवणुकीवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकारी वर्गाला धारेवर धरत आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. नवीन आयुक्तांकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असून पीपीपी तत्त्वावर अनेक संस्था महापालिकेला विनाखर्च आणि रुग्णांना शासकीय दराने सेवा देण्यास तयार असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने तत्परता दाखवून या सेवा रुग्णांसाठी सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी नवनियुक्त आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली. आपल्या पाठपुराव्यानंतर याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात महिन्याभरात एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा उपलब्ध होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कल्याण-डोंबिवली महापालिकेशी संबंधित विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रोगनिदान व्यवस्थेची वानवा आहे. खासगी डॉक्टर मानद सेवा देण्यास तयार असले तरी रोगनिदान व्यवस्था नसल्यामुळे त्यांचाही नाईलाज आहे. त्यामुळेच एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी यांसारख्या सेवा पीपीपी तत्त्वावर सुरू करण्याची मागणी वारंवार करूनही अधिकारी वर्ग आडमुठेपणा करत असल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वेळी जागेची अडचण सांगितली जाते. खासदार निधीतून डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे, पण महापालिका जागा देण्यास तयार नाही. पीपी चेंबर्सची जागा उपलब्ध करून देण्याबाबत महासभेने ठराव केल्यानंतरही विविध कारणे पुढे केली जात आहेत, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले. डोंबिवली येथील सुतिका गृहाचा पुनर्विकास स्वखर्चाने करण्याची महापालिकेची ऐपत नाही. त्यामुळे पीपीपी तत्त्वावर या सुतिका गृहाचा पुनर्विकास करून तिथे महापालिका हद्दीतील गरीब-गरजू रुग्णांना शासकीय दराने रुग्ण सेवा देण्यात यावी, यासाठीही गेली तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही हालचाल केली जात नसल्याबद्दलही खा. डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीला महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, महानगर प्रमुख विजय साळवी, नगरसेवक दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, निलेश शिंदे, प्रमिला पाटील, प्रेमा म्हात्रे आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आयुक्त गोविंद बोडके यांनी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची स्वतः पाहणी करून विविध सेवांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. ज्या सुविधांसाठी महापालिकेला पैसा खर्च करावा लागणार नाही आणि रुग्णांनाही शासकीय दराने सेवा उपलब्ध होणार आहे, अशा सुविधांसाठी महापालिकेने तातडीने पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची सूचना खा. डॉ. शिंदे यांनी केली.