ठाणे : रानभाज्यांचा रस्सा, वरण, भजी आदी पदार्थ तयार केले जातात. पोळ्यांसाठीही या वनस्पतींचा वापर केला जाताे. सुमारे १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी उपयुक्त आहेत. या औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा वापर आहारात करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यभर रानभाज्या महोत्सव आयाेजित केले. या महोत्सवाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम ठाण्यात पार पडला.
नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने त्यांना रानभाज्या म्हटले जाते. त्या मुख्यत्वे जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात. आदिवासी जमाती दैनंदिन आहारात सुमारे २५ रानभाज्यांचा उपयोग करतात. देशभरात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. यापैकी महाराष्ट्रात कोरकू, गोड भिल्ल, महादेव कोळी, वारली अशा ४० जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून त्यापैकी १५३० पेक्षा अधिक वनस्पती खाल्ल्या जातात. यात ९४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४० फळभाज्या, १९८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजातींचा समावेश आहे.
राज्यातील ३३ जिल्ह्यांतील २३० तालुक्यांत सोमवारी एकाच वेळी हा रानभाज्या महोत्सव पार पडला. या महोत्सवाचा राज्यस्तरीय कार्यक्रम ठाण्यातील वागळे इस्टेटमधील फेडरेशन हाऊसमध्ये झाला. या महोत्सवात अळू, हळद, करटुली, पातूर, बांबू, अंबाडी, करवंद अशा जवळपास १०० ते १५० प्रकारच्या दुर्मीळ रानभाज्यांचा समावेश होता. याशिवाय ठाण्यातील वर्तकनगरमध्ये सोमवारपासून १५ ऑगस्टदरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
--------
१) सुरण
सुरण या कंद भाजीत अ,ब,क ही जीवनसत्त्वे आहेत. हा कंद लोणच्याच्या स्वरूपात वायुनाशी समजला जातो. आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी आहे. दमा, मूळव्याध, पोटदुखी, हत्तीरोग व रक्तविकारांवर ही सुरणाची भाजी उपयोगी आहे.
-------
२) कपाळफोडी
कपाळफोडीही भाजी ही आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलावविरोध यामुळे अंग जड झाल्यासारखे वाटत असल्यास या भाजीने आराम पडताे. गुप्तरोगामध्येही या भाजीचा उपयोग होतो. आधुनिक शास्त्रानुसार या कपाळफोडीच्या पानात अँटिबायोटिक व अँटिपॅरासायटिक तत्त्वे असल्याने जुनाट खोकला, छाती भरणे आदी विकारांत ही भाजी उपयुक्त ठरते.
--------
कुरडू
कुरडू भाजीच्या बिया मुतखडा विकारात उपयुक्त आहेत. ही पालेभाजी लघवी साफ करायला उपयुक्त ठरते. तसेच कफही कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा. कोवळ्या पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी. दमेकरी, वृद्ध माणसांचा कफविकार यावर ही भाजी गुणकारी ठरते.
----
उंबर
या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानावरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.
-----
५) मायाळू
ही औषधी गुणधर्म व उपयोगी वनस्पती आहे. मायाळू ही शीतल वनस्पती तुरट, गोडसर स्निग्ध, निद्राकार, चरबीकारक, भूकवर्धक आहे.
-------
काेट
रानभाज्या या पावसाळ्यात उगवतात. मात्र, त्यांची इतरवेळीही लागवड करता येणे शक्य आहे. या भाज्यांना इतर भाज्यांप्रमाणे मूल्य कसे मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रानभाज्यांतील टाकळा, शेवगा यांसारख्या भाज्या इम्युनिटी बूस्टर आहेत. अशा भाज्यांची माहिती आणि ती करण्याची पद्धत लोकांपर्यंत पोहचायला हवी. त्यासाठी कृषी विभागाने ‘रानभाज्या माहिती पुस्तिका’ या राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सवात प्रकाशित करण्यात आली आहे.
- अंकुश माने
जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे