कल्याण : कोळशाची टंचाई, देखभालीसाठी बंद असलेले संच यामुळे सुरू असलेल्या भारनियमनामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. कल्याणच्या ग्रामीण भागासाठी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार तेथे सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. दिवसभर जाणवणारी आॅक्टोबर हिट आणि सणासुदीच्या खरेदीच्या काळात लागू झालेल्या या भारनियमनामुळे दिव्यांच्या सणाअगोदर या भागात काळोख पसरला आहे.भारनियमनाच्या विळख्यातून शहरी भागाची तूर्त सुटका झाली असली, तरी त्याचा सर्व भार ग्रामीण भागावर पडला आहे. महावितरणच्या वेळापत्रकानुसार कल्याणच्या ग्रामीण भागात दिवसभरात तब्बल सहा ते आठ तास वीजपुरवठा बंद राहणार असल्याने तेथील अर्थव्यवस्थाच मोडून पडण्याची भीती आहे. त्यामुळे या भागात संतापाचे वातावरण आहे.दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वेगवेगळ््या उत्पादनांची, फराळाची तयारी जोमाने सुरू आहे. फराळाच्या पदार्थांसाठी लागणाºया दळणांना त्याचा फटका बसला आहे. सोबतच पाणीपुरवठाही कोलमडला आहे. दूरध्वनी सेवाही सतत खंडित होत आहे. आॅक्टोेबर हिट, त्यात तासनतास वीज नसल्याने सहामाही परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. घरात काळोख आणि वर्गातही काळोखाचा सामना ते करत आहेत.सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत असल्याने त्या काळातही महावितरणकडून वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने त्रासात भर पडत आहे. हे भारनियमन तात्पुरते असल्याचा दावा महावितरणकडून केला जात असला, तरी त्याचा फटका ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनाला बसला आहे.
सण, परीक्षेच्या तोंडावर आठ तास भारनियमनाचे ‘कल्याण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 2:04 AM