वाडा : वाड्यातील शिवसेना कार्यकारिणीने सहा महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश मिळविले मात्र विद्यामान तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क नसल्याचा ठपका ठेऊन संघटनेतील दुसऱ्या गटाने त्यांना आव्हान दिले आहे. पाटील यांच्या कार्यकाळातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले परंतु विरोधी गटाने त्यांच्या विरोधात दंड ठोपटले असून, वरिष्ठांकडे तक्रारीचा पाढा वाचला आहे. तर या विरोधकांविरोधात प्रकाश पाटलांनीही एक शिष्टमंडळ पाठवून आपली बाजू मांडली आहे. जिल्हापरिषद निवडणूका नंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरूण पाटील, शिवसेनेचे गटनेते निलेश गंधे, पंचायत समिती सदस्य अरूण अधिकारी, कुणबी सेनेतून शिवसेनेत दाखल झालेले सुनिल पाटील, उपतालुका प्रमुख कैलास सोनटक्के यांच्या गटाने तालुका प्रमुखांविरोधात आघाडी उघडली आहे. अनेक वेळा शिष्टमंडळ पाठवून वरिष्ठांकडे तक्रारी करून तालुका प्रमुख बदलण्याची जोरदार मागणी केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.तर , प्रकाश पाटील यांची तालुका प्रमुखपदी निवड झाल्यापासून शिवसेनेला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले. यापुर्वी कधी नव्हे ती जिल्हा परिषदेच्या ४ जागा तर पंचायत समितीच्या ५ जागा स्वबळावर जिंकून शिवसेनेची ताकद सिद्ध केली. मात्र तरीही पक्षांतर्गत विरोधकांनी गटबाजी सुरू केल्याने पाटील यांनी प्रा. धनंजय पष्टे व गिरीष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व माजी आमदार अनंत तरे यांची भेट घेवून आपली बाजू मांडली. (वार्ताहर)
वाड्यातील शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण
By admin | Published: August 08, 2015 9:48 PM