लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतील २७ गावांसाठी स्थापन केलेल्या ई प्रभाग कार्यालयात पाणीपुरवठा विभागासाठी वर्षभरापासून प्रशासनाने उपअभियंता नेमलेला नाही. पुढील १० दिवसांत त्याची नेमणूक न केल्यास या कार्यालयास टाळे ठोकले जाईल, असा इशारा प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील यांनी आयुक्त पी. वेलारासू यांना दिला आहे. २७ गावांमध्ये महापालिकेचे १८ प्रभाग आहेत. या प्रभागांच्या प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेने ई प्रभाग समितीचे कार्यालय सुरू केले. मात्र, वर्षभरात या प्रभाग समिती कार्यालयातून विकासकामे झालेली नाहीत. त्याच्या फाइल्सही मार्गी लावलेल्या नाहीत. २७ गावांमध्ये पाण्याची तीव्र समस्या आहे. या गावांना एमआयडीसीकडून दररोज ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. त्याचे बिल महापालिका एमआयडीसीला भरते. मात्र, वितरणाच्या नियोजनाअभावी गावांत पाणीसमस्या जाणवते. मागील वर्षी पाण्याची तीव्र टंचाई होती. त्याची झळ गावांना बसली होती. यंदा बारवी धरणात पुरेसे पाणी असूनही गावांमध्ये टंचाई आहे. पाण्याचे वितरण करण्यासाठी या कार्यालयात उपअभियंत्याचा नाही. पाणीटंचाईविषयी नागरिकांच्या तक्रार असल्यास त्याचे निराकरण प्रभाग समिती कार्यालयातून केले जात नाही. दोन महिन्यांपूर्वी गावांतील पाणीप्रश्नावरून भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी कार्यालयात अधिकाऱ्यावर हात उगारला होतो. सत्ताधारी पक्षाला २७ गावांच्या प्रश्नी टाळे ठोकण्याचा व उपोषणाचा इशारा द्यावा लागतो. यावरून, प्रशासन सत्ताधाऱ्यांना केवळ गृहीत धरत आहेत. समस्या सोडवण्यात प्रशासनाला रस नसल्याचे समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सभापती पाटील या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका आहेत. ई प्रभाग समिती कार्यालयातील पाणीपुरवठा विभागासाठी उपअभियंता नेण्यासाठी पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, प्रशासन त्यांच्याकडे डोळेझाक करत आहे. त्याचबरोबर रखडलेल्या विकासकामांच्या फाइल्सही मार्गी लावण्याची मागणी २७ गावांतील १८ नगरसेवकांनीही लावून धरली आहे.
ई प्रभागास ठोकणार टाळे
By admin | Published: June 02, 2017 5:15 AM