प्रज्ञा म्हात्रे ।ठाणे : यंदा ठाण्यात इको फ्रेण्डली मखरांचाच बोलबाला दिसून येत आहे. बाम्बू, ज्यूट, कापड, पुठ्ठा, कागदांपासून ते अगदी प्लास्टिकच्या फुलांच्या सहाय्याने केलेली मखरे जागोजागी दिसत आहेत. यंदा परदेशातील भक्तांपासून स्थानिक गणेशभक्तांपर्यंत सर्वांनीच पांढºया रंगाच्या मखराला पसंती दिली आहे. तसेच दूर्वा आणि खजुराच्या पानांपासून तयार केलेल्या मोराच्या पिसाºयाने मात्र भक्तांचे मन जिंकले आहे. आगळ्या वेगळ्या या मखराला प्रचंड पसंती आहे.गणेशोत्सवात सर्वात महत्त्वाची असते, ती सजावट. आपल्या लाडक्या बाप्पासाठी आकर्षक आरास करण्यासाठी भक्तांची धडपड सुरू असते. आकर्षक सजावट असावी, यासाठी बाजारपेठेपासून जागोजागी उभ्या असलेल्या मखरांच्या दुकानांपर्यंत फेरफटका मारून आवडीचे मखर पसंत करत आहेत. इको फ्रेण्डली मखरांनाच भक्तांची सर्वाधिक पसंती असून काही ठिकाणी १०० टक्के मखरांची विक्री झाली आहे. झोपाळा, पालखी, मंदिर याप्रमाणे मोराचा पिसारा असलेले मखर खास लक्ष वेधून घेत आहे. मोराची पिसे, दूर्वा, बाम्बू आणि खजुराच्या पानांपासून हे मखर तयार केले आहे. यंदा हा वेगळा प्रयोग असल्याचे मखर कलाकार कैलास देसले यांनी सांगितले. मंदिराच्या मखरातही वैविध्य आहे. यात देव्हारा, चौकोन, मेघडंबरी, कळस असे प्रकार आहेत. मखरांचे दर यंदा वाढवले आहेत. तरीही भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याचे देसले यांचे म्हणणे आहे. ज्यूट, बाम्बू, बाम्बूच्या चटया, खजुराच्या पाती, कापड, पेपर फ्लॉवर्सपासून ही मखरे तयार केली आहे. कागदी पुठ्ठ्यांचे नवीन फोल्डिंग डेकोरेशनही यंदा ठाण्यात दिसते आहे. १ फूट ते २२ फुटांच्या मूर्तीसाठी ते तयार केले असून यात विविध प्रकार आहेत. सिद्धिविनायक, वनराई, मयूरासन, जयपूर पॅलेस, नवरंग, महाल सेट, सुवर्ण, सूर्य, थ्रीडी गणेश महाल यांसारखे अनेक प्रकार भक्तांसाठी तयार केल्याचे मखर कलाकार नानासाहेब शेंडकर यांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी लावलेल्या रंगीबेरंगी प्लास्टिक फुलांपासून तयार केलेले मखरही आकर्षक आहे. हत्ती, मोर, जहाज, कमान, मोदक, स्टेज, झोपाळा, मंदिर यासारखे अनेक प्रकार यात पाहायला मिळत आहे. झोपाळ्यातही सहा ते सात प्रकार आहेत. या मखरांमध्ये जहाज आणि हत्तीच्या मखराला भक्तांची पसंती असल्याचे विक्रेते रामचंद्र प्रामाणिक यांनी सांगितले.बाम्बूच्या चटयांचा वापरज्यूट, बाम्बू, बाम्बूच्या चटया, खजुराच्या पाती, कापड, पेपर फ्लॉवर्स यापासून तयार करण्यात येणाºया इको फ्रेण्डली मखरांमध्ये दरवर्षी नारिंगी, पिवळा, गुलाबी आणि हिरवा हे रंग पाहायला मिळतात. परंतु, यंदा देसले यांनी २५ रंग मखरांमध्ये आणले आहेत. यात पांढरेशुभ्र असलेले मखर भक्तांच्या आवडीचे झाले आहे. त्यापाठोपाठ मोरपिसी रंगाचे मखरही आकर्षण ठरत आहे. लाल, जांभळा, पर्पल, मेहंदी, सोनेरी पिवळा अशा २५ रंगांमध्ये मखर तयार करण्यात आले आहेत.पेपर फ्लॉवर्स, लॅम्पचीही मोठ्या प्रमाणात खरेदीकाही वर्षांपूर्वी पेपर फ्लॉवर्स ही संकल्पना देसले यांनी गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात आणली. सुरुवातीला त्यांनी थोडेच फ्लॉवर्स तयार केले होते. परंतु, शेवटच्या दिवसापर्यंत या फ्लॉवर्सला मिळालेली पसंती पाहता दरवर्षी हे फ्लॉवर्स भक्तांसाठी तयार केले जात आहेत. यात आकर्षक रंग असले तरी त्यातही पांढºया रंगाच्या फुलांनी भक्तांना भुरळ घातली आहे. याबरोबरच बाम्बूच्या चटयांपासून बनवलेला लॅम्पही भक्तांच्या पसंतीस उतरत आहे.मंदिराच्या मखरांचीयंदाही परदेशवारीयंदा मोठ्या प्रमाणात ठाण्यातील इको फ्रेण्डली मखरे परदेशात गेली आहेत. अमेरिका, दुबई, सिंगापूर, नायजेरिया, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा यासारख्या ठिकाणी मखरे गेली आहे. तसेच, केरळमध्येही ते गेले आहे. यातही मंदिर मखर परदेशी गणेशभक्त घेऊन गेले असून पांढºयाशुभ्र रंगाबरोबर गुलाबी, हिरवा या रंगांतील मखरांना पसंती दिल्याचे देसले यांनी सांगितले.मूकबधिरांचेहीलागले हातमूकबधिरांना रोजगार मिळावा, यासाठी देसले यांनी त्यांना आपल्या कामात सामावून घेतले. दीड ते दोन महिन्यांपूर्वी या मूकबधिरांना शोधून ते त्यांच्या हाताला काम देत असतात. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या मखरांमध्ये ठाण्यातील २५ मूकबधिरांचा हातभार लागला आहे.
ठाण्यात इको फ्रेण्डली मखरांचा बोलबाला; यंदा पांढरा रंग फॉर्मात, परदेशातील भक्तांचीही पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 4:47 AM