लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यातील फुलपाखरांची कमी होत चाललेली संख्या पाहता शहरवासीयांनी आता आपल्या परिसरात, सोसायटीच्या आवारात पर्यावरणपूरक झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. फुलपाखरांचा अधिवास हा खाद्यवनस्पती आणि नेक्टर वनस्पतींवर अवलंबून असल्यामुळे अशा वनस्पतींची लागवड करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला तरच 'फुलपाखरू छान किती दिसते' ही ओळ प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल, असे मत पर्यावरण अभ्यासकांनी नोंदविले.बटरफ्लाय मंथच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासकांनी फुलपाखरांचे महत्त्व आणि त्यांचा जीवनक्रम याविषयी जनजागृतीची गरज असल्याचे सांगत आपले मत नोंदविले. ठाणे जिल्ह्यातील फुलपाखरांची संख्या ६0 टक्क्यांनी घटली आहे. बेसुमार वृक्षतोड, झपाट्याने झालेले नागरिकीकरण तसेच पर्यावरणपूरक झाडांचा अभाव यामुळे फुलपाखरांची संख्या प्रचंड कमी होत आहे. शहरवासीयांना फुलपाखरू पाहणे दुर्मीळच झाले आहे. गेल्या काही वर्षांत गृहसंकुले उभारली गेली आणि त्यात पर्यावरणाला पूरक नसलेली गुलमोहर, सिंगापुरी पाम, निलगिरी यासारखी झाडे लावली. ही झाडे सहज उपलब्ध असल्याने आणि दिसायला हिरवी असल्याने बांधकाम व्यावसायिकांनीही केवळ शोभेची झाडे म्हणून लागवड केली, ज्याचा पर्यावरणासाठी नाममात्र उपयोग होत आहे. अशा झाडांवर कोणतेही कीटक, पक्षी अधिवास करू शकत नाही. त्याऐवजी पळस, काटेसावर, तांगारा, वड, पिंपळ, उंबर, बोर, रिठा यासारखी झाडे लावण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य फुलपाखरू मराठी नामकरण समिती सदस्य दिवाकर ठोंबरे यांनी व्यक्त केले. फळे, फुले यामधला मधुर रस पक्षी, कीटक यांना प्रचंड आवडतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आवारात, घरातल्या कुंडीत अशी झाडे लावल्यास रंगीबेरंगी फुलपाखरे पाहायला मिळतील, असेही म्हणाले.कढीपत्ता, लिंबू, सीताफळ, पेरू, आंबा, रुई ही झाडे मुद्दाम लावली पाहिजे. पण, त्याला आलेली फळे, पाने, फुले ही लोकांनी तोडून घरात आणू नये. त्यावर कीटकांची अंडी, अळी व कोष या जीवनावस्था असतात. कढीपत्ता ही फुलपाखरांची आवडती खाद्यवनस्पती आहे. कुंडीत लावलेल्या फुलझाडांवर जास्त प्रमाणात फुलपाखरे येतात, असा निष्कर्ष आहे.- दिवाकर ठोंबरेनागरिकांना फुलपाखरू उद्यानात रंगीबेरंगी फुलपाखरे दाखविली, तर त्यांच्यात आवड निर्माण होईल आणि ते त्यांच्यासाठी आपल्या सोसायटीच्या आवारात तशी झाडे लावतील.- अनुराग नशिराबादकर,पर्यावरण अभ्यासककाही फुलझाडांवर फुलपाखरे जास्त प्रमाणात वास करत असतात. घरातील कुंडीतील झाडांकडे फुलपाखरे जास्त आकर्षित होतात. लोकांनी अशी झाडे आपल्या आसपास लावल्यास त्यांना फुलपाखरांचे निरीक्षणही करता येईल.- अमेय कुलकर्णी, पर्यावरणप्रेमी
फुलपाखरांसाठी पर्यावरणपूरक झाडांची लागवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:11 AM