नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून सामान्य नागरिकांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली असून सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कट्टीबद्ध आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.
शनिवारी काल्हेर येथे जिल्हा परिषद ठाणे,पंचायत समिती भिवंडी व काल्हेर ग्राम पंचायतीच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाटील बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे जिल्हा पालक मंत्री शंभूराज देसाई,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,ठाणे जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप,तहसीलदार अधिक पाटील,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे,काल्हेरच्या सरपंच रेखा मुकादम,ग्रामविकास अधिकारी रमेश राठोड यांच्यासह महसूल विभाग व पंचायत समितीचे अधिकारी तसेच महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून राज्यात शासन आपल्या दारी ही योजना राबवून राज्यातील शिंदे सरकार गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे हे सरकार खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे सरकार असून २०४७ साली भारत निश्चितच विकसित देश होईल अशी ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.
तर शासन आपल्या दारी या योजनेच्या शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी २९ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून आतापर्यंत शासन आपल्या दारी या योजनेतून राज्यातील पावणेदोन कोटी लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली असून शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा तसेच सरकारी यंत्रणेने लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात असे निर्देश देखील देसाई यांनी शासकीय यंत्रणेला दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड बनवून दुग्ध व्यवसायासाठी ६० लाख रुपये कर्ज घेणाऱ्या तालुक्यातील एलकुंदे येथील लाभार्थी बळीराम माणेरकर यांचा देखील सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाठिकाणी केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारी मोदींची हमी हि केंद्र सरकारी योजनांची माहिती देणारी गाडी देखील सभास्थळी ठेवण्यात आली होती ज्या गाडीचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या आजच्या संवाद कार्यक्रमात केला होता.हा संवाद कार्यक्रम केंद्रीय मंत्री पाटील व पालकमंत्री देसाई यांनी एकत्रितपणे पहिला.