लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाले होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच अर्थव्यवस्था गेले अडीच महिने ठप्प होती. अखेर, आता शुक्रवारपासून सम-विषम पद्धतीने जिल्ह्यातील बाजारपेठा, इतर दुकाने सुरू होणार आहेत. यामुळे शहराची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्याची चिन्हे असून त्याचबरोबर जिल्हावासीयांना जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर आवश्यक असलेल्या वस्तूही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, या दुकानांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर ही महानगरे चांगलीच भरडली गेली आहेत. जीवनावश्यक वस्तू, दूध, औषधालये आणि भाजीपाला दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने बंद आहेत. या संचारबंदीमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था ठप्प होती. मात्र, ती आता पुन्हा रुळावर आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महापालिका प्रशासनांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरांतील बाजारपेठा आणि कपडे, हार्डवेअर, स्टेशनरीसह अन्य साहित्यांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
या निर्णयानंतर प्रभाग समितीस्तरांवर सम-विषम पद्धतीने दुकाने कशी सुरू करायची, याचे नियोजन प्रशासनाने केले होते. या नियोजनासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसोबतही ठाणे महापालिका प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार, रस्त्यांवरील दुकानांच्या हद्दीही निश्चित केल्या आहेत. ठाणेशहराच्या मध्यवर्ती भागातील राममारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी, ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या आस्थापना आहेत. तर, जांभळीनाका येथे मोठी भाजी मंडई, खारकरआळीत मोठी धान्य बाजारपेठ आहे. कल्याण-डोंबिवलीत स्टेशन परिसरात बाजारपेठा आहेत. उल्हासनगरात स्टेशन परिसरासह गजानन मार्केट प्रसिद्ध आहे. हे सर्वच शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तर, शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागांत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू होणार असली, तरी मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत.सम-विषम प्रयोगाची अंमलबजावणीगर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून सम-विषम तारखांच्या प्रयोगावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार, रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखांना उघडण्यात येणार आहेत, तर दुसºया बाजूची दुकाने विषम तारखांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहणार आहेत. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करूनये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुकानदारांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे.