उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील वुडलँड कॉप्लेक्स इमारती मधील महापालिका शिक्षण मंडळ कार्यालय प्रशासकीय कामासाठी मुख्यालय कार्यालयात हलवा, अशी मागणी मंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्तांना केली. उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळा अंतर्गत पालिकेच्या २२ शाळेसह खाजगी व अनुदानित शेकडो शाळा मंडळा अंतर्गत येतात. महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय यापूर्वी मुख्यालय मध्ये होते. मात्र जागा कमी पडते म्हणून शिक्षण मंडळाचे कार्यालय वुडलँड कॉम्प्लेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविले.
दरम्यान, तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शिक्षण मंडळाचे कार्यालय प्रशासकीय कामाच्या दृष्टिकोनातून महापालिका मुख्यालय मध्ये आणले होते. त्यानंतर पुन्हा राजकारण होऊन मंडळाचे कार्यालय वुडलँड कॉम्प्लेक्स या इमारती मध्ये हलविले होते. महापालिका मुख्यालय व शिक्षण मंडळाच्या कार्यालयाचे अंतर लांब असल्याने, प्रशासकीय कामासाठी गैरसोयीचे आहे. अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी शिक्षण मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालय हलविण्याची मागणी केली होती.
महापालिका शिक्षण मंडळा अंतर्गत पालिकेच्या विविध माध्यमाच्या २२ तर खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळेची संख्या एकून २०८ आहे. या सर्व शाळेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षण मंडळाची आहे. दरम्यान मंडळाचे प्रशासन अधिकारी पद रिक्त असून प्रभारी प्रशासन अधिकाऱ्याचा पदभार मंडळाचे अधिक्षक हेमंत शेजवळ यांना दिले. प्रशासकीय काम सोयीचे व्हावे म्हणून प्रभारी प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ, लेखा अधिकारी नीलम कदम यांच्यासह ३४ कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनद्वारे आयुक्त अजीज शेख यांना शिक्षण मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयात स्थलांतरित करण्याची मागणी केली. महापालिका शाळा क्रं-१८ व २४ शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली गेल्या ४ वर्षांपासून तोडून ठेवली. मात्र अद्यापही शाळा इमारत उभी राहू शकली नाही. शाळेचे हजारो मुले दुसऱ्या एका खाजगी शाळेच्या खोल्यात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. असे प्रकार कार्यालयाचे स्थलांतर झाल्यावर टळणार आहे.
शिक्षण मंडळाला पूर्वीचे येणार वैभव एकेकाळी शिक्षण मंडळाच्या शाळेतून हजारो मुले शिक्षण घेत होती. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सिंधी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या असून गुजराती माध्यमाची एकमेव शाळा शेवटची घटका मोजत आहे. मराठी व हिंदी माध्यमाच्या शाळेत मात्र मुलांची संख्या लक्षणीय आहे. मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयात स्थलांतरित केल्यास मंडळाला पूर्वीचे वैभव येणार असल्याचे मत राजकीय नेते व्यक्त करीत आहेत.