ठाणे : शिक्षण मंडळाच्या ‘शाळा आपल्या दारी’ मुद्यावरून शिवसेनेच्या गटात जोरदार खडाजंगी झाली आहे. भोईर अॅण्ड कंपनीला बोलण्याचे थांबवल्याने भोईर कुटुंब नाराज झाले असून त्यांनी महापौरांच्या विरोधात थेट ‘मातोश्री’वर तक्रार करण्याचे ठरवले आहे. शनिवारच्या महासभेत हा प्रकार घडला. यावेळी विरोधक सभागृहात नसतानाही शिवसेनेत अशा प्रकारे खडाजंगी झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.शुक्रवारची तहकूब महासभा शनिवारी दुपारी सुरू झाली. राष्टÑवादीने शुक्रवारप्रमाणेच महासभेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महासभा सुरळीत होईल, अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा होती. परंतु, शाळा आपल्या दारीच्या मुद्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी याच अनुषंगाने मांडलेल्या लक्षवेधीची पुन्हा महापौरांना आठवण करून दिली. त्यानंतर, शिक्षण मंडळातील त्रुटीबाबतही त्यांनी चर्चा केली. याच मुद्याच्या अनुषंगाने संजय भोईर, उषा भोईर, भूषण भोईर यांनीही त्याच मुद्याला हात घालून चर्चा वाढवली. याबाबत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा महत्त्वाचा विषय असल्याचे सांगितले. त्यामुळे वाद आणखीनच वाढला. महापौर अखेर देवराम भोईरांवर आपल्या स्टाइलने घसरल्या. त्यामुळे भोईर फॅमिली नाराज झाली. परंतु, तोपर्यंत महापौरांनी सभागृहातून काढता पाय घेतला. ज्येष्ठ नगरसेवकाचा अवमान झाल्याचे सांगून भोईर फॅमिलीनेदेखील सभात्याग केला. त्यानंतर, नरेश म्हस्के यांच्याशी त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून आम्ही याचसाठी पक्षात आलो होतो का, असा अपमान करायचा होता का, अशी चर्चा झाली. म्हस्के यांनी त्यांची समज काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, नाराज भोईर यांनी थेट ‘मातोश्री’वर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकाराची लेखी तक्रार करणार असल्याची माहिती संजय भोईर यांनी दिली. एकूणच या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
शिक्षण मंडळात सेनेच्या दोन गटांत ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:04 AM