शिक्षण परिषद हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तयार करण्यात आलेले नवे शिक्षण धोरण कशा प्रकारे प्रेझेंट करायचे, यासाठी या कार्यक्रमाचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. याचा फायदा आम्हाला होणार असेल तर आम्ही तो नक्कीच करून घेऊ. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा कार्यक्रम लाभदायक ठरणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
“आंतर भारती" आणि "ग्राममंगल" आयोजित समारंभात 'ग्राममंगल' या संस्थेच्या कार्याची ४० वर्षे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सामंत पत्रकारांशी बोलत होते.
याच वेळी सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांचे दोने डोस झालेले असावेत. पण, ज्यांचे दोन डोस झालेले नाहीत, त्यांची ना इलाजाने ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागेल असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचे संकट पाहता नक्की काय करायचे यासंदर्भात डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावे. अशा सूचना आम्ही केल्या आहेत. तसेच कुलगुरूंनीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.
अपक्षांच्या प्रचारासाठी न गेल्याने रामदास भाईंचा गैरसमज झाला असेल -यावेळी रामदास कदम यांच्या संदर्भात बोलताना सामंत म्हणाले, मी शिक्षण परिषदेला आलो आहे. ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत. कालच्या आरोपासंदर्भात बोलण्यापेक्षा आजच्या कार्यक्रमाला न्यू एज्युकेशन पॉलिसी परिस्थितीवर बोलावे. याच्यावर चर्चा केली तर चांगले होईल. कालच्या आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात शिवसैनिक म्हणून मी बोललो आहे. ते (रामदास कदम) ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो होतो, तो पक्षाचा आदेश होता. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते अपक्षांच्या प्रचारासाठी गेलो नवतो. अपक्षाच्या प्रचारासाठी न गेल्यामुळे कदाचित रामदास भाईंचा गैरसमज झाला असेल, हे मी काल सांगितले आहे.