कल्याण : केडीएमसीच्या परिवहन, शिक्षण आणि दहा प्रभाग समिती सभापतीपदांची निवडणूक बुधवारी झाली. या समित्यांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने समित्यांच्या सभापतीपदांवर संबंधितांची बिनविरोध निवड झाल्याचे सोमवारीच स्पष्ट झाले होते. दरम्यान, याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी निवडणुकीच्या दिवशी करण्यात आली. परिवहन समिती सभापतीपदी शिवसेनेचे मनोज चौधरी आणि शिक्षण समिती सभापतीपदी सेनेच्या नमिता पाटील यांच्या निवडीची घोषणा पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली.
परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि हे पद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे सेनेचे सध्या सात सदस्य समितीत आहेत, तर शिक्षण समितीमध्ये पक्षीय बलाबलानुसार शिवसेना ५, भाजप ४, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी एक अशी स्थिती आहे. यंदा शिवसेनेची टर्म असल्याने दोन्ही सभापतीपदांसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच होती. परिवहनसाठी मनोज चौधरी तर शिक्षण समितीसाठी नमिता पाटील यांची नावे उमेदवार म्हणून सेनेकडून देण्यात आली. या दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पण बुधवारी निवडणुकीच्या दिवशी याची अधिकृत घोषणा होईल, असे सचिव कार्यालयातून सांगण्यात आले. बुधवारी परिहवन, शिक्षण समिती सभापतीसह दहा प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूकही पार पडली. प्रारंभी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये सर्व अर्ज वैध ठरले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. पण यादरम्यान कोणीही अर्ज माघार घेतली नाही. अखेर तिन्ही समित्यांवर बिनविरोध निवडून आलेल्यांची नावे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडून जाहीर करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित सभापतींचे नार्वेकर यांच्यासह महापौर विनीता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सामान्य प्रशासन उपायुक्त मारुती खोडके, सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट, सचिव संजय जाधव, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, विश्वनाथ राणे, शिवसेना-डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदींसह परिवहन, शिक्षण समिती सदस्य आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिनंदन केले. परिवहन व शिक्षण सभापतीपदाची निवडणूक महापालिका भवनमधील स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली, तर दहा प्रभागांच्या सभापतीपदाची निवडणूक स्वा. विनायक सावरकर या महासभेच्या सभागृहात घेण्यात आली.‘त्यांच्या’ही निवडीवर शिक्कामोर्तब‘अ’ प्रभागात दयाशंकर शेट्टी, ‘ब’ प्रभागामध्ये नीलिमा पाटील, ‘ड’ प्रभागात राजवंती मढवी, ‘ग’मध्ये दीपाली पाटील, ‘ई’ प्रभागात रूपाली म्हात्रे, ‘आय’मध्ये विमल भोईर (सर्व शिवसेना) ‘क’मध्ये शकिला खान (शिवसेना सहयोगी अपक्ष) यांच्यासह ‘जे’ प्रभाग गणेश भाने, ‘फ’ प्रभाग विश्वदीप पवार आणि ‘ह’ प्रभागात वृषाली जोशी या भाजप सदस्यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या दहाही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदावरही संबंधितांची बिनविरोध निवड झाली होती. त्याचीही अधिकृत घोषणाही बुधवारी करण्यात आली.परिवहन सशक्त करण्यावर भर :परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असून उपक्रम सशक्त करण्यावर भर राहील, अशी ग्वाही नवनिर्वाचित परिवहन सभापती चौधरी यांनी दिली. अपूर्ण राहिलेले प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच रिंगरूट तसेच जादा उत्पन्न देणाऱ्या मार्गांवर बसची संख्या वाढवून सेवा कशी जलदगतीने देता येईल, यासाठी माझे प्रयत्न राहतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, शिवसेनेने स्थानिक पातळीवर सभापती चौधरी यांच्या रूपाने पहिल्यांदाच कोळी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे.