ठाणे : विद्यादानमुळे शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळालीच शिवाय मूल्य, संस्कारांची शिदोरी मिळाली. या मदतीमुळे उच्च शिक्षण घेण्याचे आमचे स्वप्न साकार झाले अशा कृतज्ञतेच्या भावना विद्यार्थांनी व्यक्त केल्या. निमित्त होते, ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थाचा निरोप समारंभ. शिवसमर्थ शाळेतील शिवदौलत सभागृहात हा समारंभ संपन्न झाला.
यंदा पहिल्यांदाच संस्थेच्या आर्थिक मदतीने पदवीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विविध विद्या शाखेतील विद्यार्थांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता सदिच्छा देण्यासाठी संस्थेने निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थांनी भावना व्यक्त केल्या, विद्यार्थी म्हणाले, संस्थेच्या मदतीमुळे आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षण अर्धवट राहणार अशी भीती वाटत होती मात्र विद्यादानने आर्थिक मदतीचा हात दिल्याने शिक्षण पूर्ण होत असल्याने घरी आनंदी वातावरण आहे. विद्यार्थांसोबत त्यांचे पालक देखिल यावेळी उपस्थित होते. पालकांनी देखिल भावना व्यक्त करत विद्यादानचे आभार मानले. आमच्या कुटुंबाला विद्यादानमुळे मानसिक आधार मिळाला, आमच्या सुखदुःखात विद्यादान सोबत राहिली ही कधीही न विसरता येणारी घटना असल्याचे एका पालकांनी सांगितले. ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळ ही संस्था गेली दहा वर्ष समाजातील गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थांना शिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक मदत करते. आजतागायत संस्थेच्या मदतीने असंख्य विद्यार्थी मेडिकल, इंजिनियर, उपयोजित कला, वाणिज्य, तसेच विविध विद्या शाखेत उच्च शिक्षण घेवून विविध पदावर कार्यरत आहेत. या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. संस्थेच्या रंजना कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले तर खुमासदार शैलीत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना शिर्के यांनी केले.