अंबरनाथ : अंबरनाथ येथील सर्वात जुन्या असलेल्या दी एज्युकेशन सोसायटीची त्रैवार्षिक निवडणूक उद्या होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन गटांत ही निवडणूक होत असल्याने चुरस निर्माण झालेली आहे. शहरातील सर्वात जुन्या असलेल्या या संस्थेत बहुतेक सदस्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहे. या संस्थेचे साडेपाचशे सदस्य आहेत.१९३६ मध्ये स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम वासुदेव ऊर्फ भाऊसाहेब परांजपे यांनी पुढाकार घेऊन या संस्थेची स्थापना केली आहे. मराठी माध्यमांची ही सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे. आज या संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, भाऊसाहेब परांजपे विद्यालय, प्रभाकर द्वारकानाथ कारखानीस महाविद्यालय, बारा तासांची पंचकोशाधारित गुरुकुल शाळा, बालभवन प्राथमिक शाळा, सुशीलाबाई दामले विद्यालय, शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय, आदिवासी माध्यमिक विद्यालय डोलारे, आदिवासी माध्यमिक विद्यालय अंदाड अशा शाळा आणि महाविद्यालयांचा मोठा पसारा आहे.पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती प्रकाश सुळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून ग्रंथाभिसरण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मथुरे हे त्यांना सहकार्य करत आहेत. उद्या सकाळी ८ ते १२ यावेळेत मतदान होणार असून मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा या संस्थेवर कायम राहिलेला आहे. मात्र, यंदा संघामध्येच दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर आणि माजी अध्यक्ष संतोष आदक यांच्या नेतृत्वाखाली एक गट लढत असून मनोज घावट, विद्यमान कार्यवाह सुहास आठल्ये यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट निवडणूक लढवत आहे. घावट गटातील अजित गोडबोले हे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्यातच जमा आहेत. या पदाकरिता अजित गोडबोले यांचा एकमेव अर्ज आलेला आहे.साडेपाचशे सदस्य निवडणार पदाधिकारीडॉ. पाटगावकर हे अध्यक्षपदाकरिता उभे आहेत. त्यांच्या गटातून संतोष आदक हे कार्यवाहपदासाठी उभे आहेत. सुधींद्र शूरपाली, दिलीप कणसे, गोपाळ दामले, पंकज भालेराव, मकरंद सावंत, शैलेश रायकर हे उभे आहेत. मराठी माध्यमांची ही जुनी संस्था आहे.आठल्ये हे पुन्हा कार्यवाहपदासाठी निवडणूक रिंगणात असून घावट हे त्यांच्या पॅनलमधून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. प्रसाद जोशी हे सहकार्यवाहपदासाठी, दिलीप साठे, संजय खरे, अभय कडू, रवींद्र हरहरे, कल्पलता उपाले, अजित पटवर्धन, विनय पाठक हे रिंगणात आहेत.
एज्युकेशन सोसायटी : निवडणूक होणार चुरशीची
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 2:38 AM