रवींद्र साळवेमोखाडा : मुंबईपासून १०० किमी अंतरावर आदिवासी दुर्गम खोऱ्यात विखुरलेला मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव आजही सोयी-सुविधांपासूनच वंचित आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगार आहेत. परंतु असे असताना जेमतेम सातवीपर्यंतचे शिक्षण असतानाही ‘पैशांचा पाऊस’ या बनवाबनवीच्या बोगस धंद्यामुळे काेट्यवधींमध्ये लोळणाऱ्या कृलोद येथील रमेश राथड या भोंदूबाबाचा प्रवास थक्क करणारा आहे.
घरातील परिस्थिती दारिद्र्याची, कुटुंबामध्ये उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही, शेतीवर कशीबशी उपजीविका सुरू होती. यानंतर रमेश राथड या इसमाने लोकांना जडीबुटी आयुर्वेदिक औषधे देतो, तुम्ही मला पैसे द्या, या आधारावर माया गोळा करायला सुरुवात केली. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त कमाई होत नसल्याने झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबून दुप्पट पैसे करून देणे, पैशांचा पाऊस पाडणे, असा गोरखधंदा त्याने सुरू केला. यावेळी त्याने लोकांना लुबाडणारी एक टोळी सक्रिय केली. गेल्या सात ते आठ वर्षांत या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे.पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून पैशांचा पाऊस पाडण्याचा विधी (पूजा) करण्याची तारीख जाहीर करतो आणि रात्री घरामध्ये अंधारात पूजेला बसतो. ग्राहकांना काही अंतरावर ठेवतो, पैसे पाडायला सुरुवात होताच पोलीस येतात व पळापळ सुरू होते. भोंदूबाबा व ग्राहक पळून जातात आणि बनावट पोलीस पैसे घेऊन निघून जातात. नंतर भोंदुबाबा पैसे वाटून घेतो. अशा पद्धतीने कधी पोलिसांच्या आशीर्वादाने, तर कधी बनावट पोलीस भासवून राजरोसपणे हा खेळ चालत असे.
दरम्यान, ११ जानेवारी २०२० रोजी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वाडा तालुक्यातील ४ तरुणांना पोलिसांनी गजाआड केले. त्या वेळेस पालघर क्राईम पोलिसांनी लाखो रुपयांच्या खोट्या नोटा वाडा तालुक्यातील एका गावातून जप्त केल्या. मात्र, या गुन्ह्याचा तपास झाला नाही. हे प्रकरण दडपले गेले, अशी अनेक प्रकरणे याअगोदर दाबली गेली आहेत. परंतु आता मात्र या भोंदुबाबाचे बिंग फुटले असून, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या तत्परतेमुळे मोखाडा पोलीस ठाण्यात या भोंदुबाबावर जादूटोण्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.