सदानंद नाईक, उल्हासनगर: भविष्यवेधी शिक्षणाचे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी वेध परिवारा तर्फे ठाणे जिल्ह्यातील स्वयंप्रेरित शिक्षकांची शैक्षणिक सहल पुणे जिल्हा परिषेदच्या वाबळेवाडी शाळा येथे गेली. शाळेतील अध्ययन कृती संदर्भात सखोल मार्गदर्शन या सहलीच्या प्रशिक्षणात शिक्षकांना देण्यात आले आहे.
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण व शाळेतील अध्ययन कृती यासंदर्भात सखोल मार्गदर्शन शिक्षकांना मिळावे म्हणून २६ मार्च रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. सहलीला जिल्ह्यातील ७० शिक्षाकांनी सहभाग नोंदविला. पारंपारिक शिक्षण व भविष्यवेधी शिक्षण यातील नेमका फरक काय ? याविषयी शिक्षकांचे प्रबोधन सहली दरम्यान करण्यात आले. शैक्षणिक सहल व प्रशिक्षण वेळी पुणे येथील वाबळेवाडी या जिल्हा परिषद शाळेबाबत शिक्षकांना शाळेच्या उपक्रमात बाबत सखोल माहिती दिली. द्विशिक्षकी शाळा ते आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळवण्या पर्यंतचा शाळेचा झालेला प्रवास शिक्षकांसमोर मांडण्यात आला. पुणे येथील वाबळेवाडी या शाळा सहलीचे नियोजन वेध परिवार ठाणेच्या समन्वयक संगीता बाजीराव ठुबे यांनी केले.
या शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा कसा मिळाला? लोकसहभाग कसा मिळवला, विविध प्रकारच्या परदेशी भाषा विद्यार्थी कसे आत्मसात करतात? भौतिक सुविधा, पालक सहभाग, स्वयंअध्ययनाने, गट पद्धतीने विद्यार्थी कसे अध्ययन करतात ? सोलार ऊर्जेचा वापर, स्पर्धा परीक्षांची तयारी या आणि अशा अनेक गोष्टींचा उलगडा होण्यासाठी तसेच प्रत्यक्ष शाळा भेटीतून प्रेरणा मिळावी या उद्देशाने शैक्षणिक सहलीचे आयोजन केल्याची माहिती संच्युरी शाळेच्या मुख्याध्यापिका बबिता सिंग व नीलम सिंग यांनी दिली. ज्यांचे शैक्षणिक कार्य स्वप्नवत आहे, जे सर्व शिक्षकांचे आदर्श आहेत. त्या दत्तात्रय वारे गुरुजीची शिक्षकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण जगाला भारावून सोडणारे दैदीप्यमान काम कसे केले हे जाणून घेतले. वाबळेवाडी शाळा भेटीमुळे निश्चितच वेध परिवार ठाणे शिक्षकांना जून-२०२४-२०२५ ह्या नवीन शैक्षणिक वर्षात आपापल्या शाळांमध्ये भरीव कार्य करता येणार आहे.