बालकामगार प्रथेविरूद्ध जनजागृती अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले. महिनाभर चाललेल्या या अभियानात ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही सहायक कामगार आयुक्त कार्यक्षेत्रातील २६९ आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत सात बालकामगार आणि २६ किशोरवयीन कामगार आढळले. प्रत्येक जिल्ह्यात महिन्यातून तीन कारवाया करण्याचे आदेश आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यातील तिन्ही कार्यलये महिन्याला तीनतीन कारवाया करतात. म्हणजे, एकूण नऊ कारवाया होत असल्याने इतर जिल्ह्यांपेक्षा ठाण्यात तीनपटीने मोहीम राबवणारे ठाणे जिल्हा कामगार उपायुक्त संतोष भोसले यांच्याशी साधलेला संवाद...
बालकामगार कामावर ठेवणे हा गुन्हा आहे, हे माहीत असताना त्यांना का ठेवले जाते?याला प्रामुख्याने परिस्थिती कारणीभूत असते. पण, आता तितका प्रभाव राहिलेला नाही. कायद्यामध्येही सुधारणा करण्यात आली. त्यानुसार, धोकादायक आणि बिगरधोकादायक असे प्रकार केल्याने धोकादायकमध्ये बालकामगार आणि बिगरधोकादायकमध्ये किशोरवयीन कामगार मोडतात. दंडाची रक्कमही ५० हजार इतकी केली असून कारावासाची शिक्षा ही सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत वाढवली आहे.
या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी जनजागृती केली जाते. ती नेमकी कशी होते?
राज्य कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार, ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात बालकामगार प्रथा नष्ट करण्याबाबत जनजागृती करताना, कायद्याच्या चौकटीबाहेर गेल्याशिवाय ती होणार नाही. या मोहिमेमध्ये पोस्टर, बॅनर्स, स्टिकर्स, सेल्फी पॉइंट, स्वाक्षरी तसेच विविध व्यापारी, औद्योगिक संघटना यांच्या पातळीवर बैठक घेतल्या. त्याचबरोबर विविध शाळांमधील मुलांच्या प्रभातफेऱ्या काढल्या. ठाणे, कल्याण, मुंब्रा रेल्वेस्थानकांवर जनजागृतीही केली. यावेळी ही प्रथा नष्ट करण्याबाबत वेगवेगळ्या पातळीवर जनजागृती केल्यास बालकामगार प्रथा निश्चितच नष्ट करता येऊ शकेल. समाजानेही यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे.
कोणकोणत्या संस्थांनी सहभाग घेतला होता?
या जनजागृतीत विविध सामाजिक संंघटना, संस्था, व्यापारी असोसिएशन, औद्योगिक संघटना, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प आदींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, भिवंडीत सेवाग्री या संस्थेने काम केले.