ठाणे : मोठा गाजावाजा करुन शेतकरी आपल्या दारी म्हणत ठाण्यात भरणारा आठवडा बाजार दीडच वर्षात बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणचे बाजार आधीच बंद झाले आहेत, तर उरलेल्यांवर परप्रांतीयांनी कब्जा केला आहे. शेतक-याचा माल म्हणून वाशीच्या मार्केटमधील माल तोही महागड्या दराने ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे.शेतक-यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला प्रतिसाद देत ठाण्यातही, भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीदेखील शेतकरी आठवडा बाजार आपआपल्या प्रभागात सुरू केला होता. सुरुवातीला चांगला, सेंद्रीय आणि शेतकºयांच्या शेतातील शेतमाल म्हणून ग्राहकांनी महाग असूनही हा भाजीपाला आपलासा केला. परंतु, हाकेच्या अंतरावर असलेल्या जांभळीनाक्याच्या मार्केटमधील भाजीचे दर आणि या आठवडा बाजारामधील भाज्यांचे दर यात तफावत आढळून आली. काही ठिकाणी यावरुन वांदग झाल्याची माहिती आता समोर आली आहे. काहींनी केवळ पक्षात आपली उंची वाढविण्यासाठी फोटोसाठी काही दिवस हा बाजार सुरू केला. परंतु,शहरातील जवळपास बहुतेक ठिकाणच्या आठवडी बाजाराचा बाजारच आता उठला असल्याची माहिती भाजपाच्याच सूत्रांनी दिली.ठाण्याच्या इतर बाजारपेठांमध्ये भाजीपाला स्वस्त आणि या ठिकाणी मात्र महाग मिळत असल्याने ग्राहकांनी या बाजाराकडे पाठ फिरविली. परिणामी, घोडबंदर भागातील पातलीपाडा, साकेत, वृदांवनसह इतर ठिकाणच्या बाजारांना टाळे लावण्याची वेळ आली. ही बाब आता भाजपाचे कार्यकर्तेदेखील मान्य करीत आहेत.दर आठवड्याला दूरवरून भाजी घेऊन येऊन येत होता. परंतु, त्याला येणारा वाहतूक खर्च, येण्याजाण्यामधील अडचणी, आणि शेतात भाजी पिकवायची की भाजी विकायची असा पेच त्यांच्यापुढे उभा राहिल्याने शेतकºयांनीच टप्याटप्याने या बाजाराकडे पाठ फिरविली आहे.शेतकºयांनी पाठ फिरविल्यानंतर आपली पक्षातील इमेज राखण्यासाठी काही राजकीय मंडळींनी परप्रांतीयांना या ठिकाणी आणून त्यांच्याकडून बाजार सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. शेतातील माल म्हणून वाशीच्या मार्केटमधून भाजीपाला आणून तो ग्राहकांना विकण्याचा प्रकार सुरू आहे.यात गावदेवी मैदानात भरण्यात येत असलेला बाजार अपवाद म्हणावा लागणार आहे. परंतु, त्याठिकाणीदेखील ग्राहकांनी काहीअंशी पाठ फिरविली आहे.
आठवडा बाजाराकडे शेतक-यांची पाठ, वाशीच्या एपीएमसीचा माल खपवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:48 AM