ठाणे : लोकमान्यनगरातील महिला सोमवारी रिक्षात ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल विसरली. नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने शुक्रवारी हा मुद्देमाल महिलेस परत मिळाला.मूळच्या दिल्ली येथील सुनीता सोनकार २१ आॅगस्ट रोजी बहिणीसह मालाडला जाण्यासाठी निघाल्या. लोकमान्यनगरातून त्या रिक्षाने नितीन कंपनीपर्यंत पोहोचल्या. तिथे भाडे दिल्याबरोबर रिक्षाचालक निघून गेला. घाईगडबडीत सोनकार यांची काळ्या रंगाची बॅग रिक्षातच राहिली. बॅगमध्ये दीड लाख रुपये रोख आणि दागिने मिळून ४ लाख ६० हजारांचा ऐवज होता. सोनकार यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार नोंदवली.आॅटोरिक्षाचा नोंदणी क्रमांकही महिलेस माहीत नसल्याने तपासामध्ये अडचणी आल्या. पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी तीन पथके गठीत केली. सीसी कॅमेºयांचे फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रिक्षाचा नोंदणी क्रमांक मिळवला. त्याआधारे पोलिसांनी रिक्षाचालकाची माहिती काढली असता, तो खारेगाव येथील रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी चालकाच्या घरी धडक दिली, तेव्हा त्याने महिलेची बॅग काढून दिली. पोलिसांनी मुद्देमालाची बॅग महिलेच्या स्वाधीन केली.
रिक्षात विसरलेला चार लाखांचा ऐवज नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने महिलेस परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:40 AM