ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 11 - नेवाळी येथील आपल्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देतानाच मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करून उभयपक्षांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यात येईल, असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
नौदलाने जबरदस्तीने या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे सर्वोच्च पातळीवर तोडगा निघेस्तोवर कुठल्याही प्रकारच्या हालचाली करू नका, अशा सूचनाही त्यांनी नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
नेवाळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलेल्या या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत, असा दावा करत नौदलाने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असून बुधवारी हजारो शेतकऱ्यांनी नौदलाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. नौदलाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात राग खदखदत असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवाळी येथे आंदोलकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील फोनवरून चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य त्यांना पटवून दिले आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी तातडीने यासंदर्भात बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
याप्रसंगी घटनास्थळी असलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी या जमिनींच्या बाबतीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, त्यामुळे संयमाची भूमिका घेण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठ पातळीवर या प्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धापासूनचा हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे अनेक अडचणी आहेत. मात्र, संरक्षण खात्याचे देखील नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही, अशा प्रकारे उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा निघेस्तोवर शेतकरी आणि नौदल अशा दोघांनीही संयम बाळगावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.