डोंबिवली : पावसाने दडी मारल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच शहरात आठवडाभरापासून ठिकठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असल्याने त्रासात आणखीन भर पडली आहे. पूर्वेतील म्हात्रेनगर, रामनगर, राजाजी पथ येथे मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून आठ तास वीज गायब झाल्याने रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली. वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. यासंदर्भात ऊ र्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी सांगितले.शहरातील फडके रस्ता, नेहरू रस्ता, बाजीप्रभू चौक, मानपाडा क्रॉस रस्ता, चिपळूणकर रस्ता, रामनगरचा काही भाग, राजाजी पथ, म्हात्रेनगर आदी भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड शोधण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पाच तास लागले. संतप्त नागरिकांनी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत महावितरणच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना घरी जाता येणार नाही, असा पवित्रा घेतला होता. यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता हर्षद मेहेत्रे हेही घटनास्थळी होते. रात्री वाहतूक नियंत्रण कक्षाजवळील फिडरजवळ केबलमध्ये बिघाड आहे का, हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर, पहाटे २ वाजून ४० मिनिटांनी बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हळूहळू वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज दिक्कड यांनी सांगितले. तर, म्हात्रेनगरमध्ये पहाटे ४ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. घटनास्थळी रामनगरचे नगरसेवक मंदार हळबे, भाजपचे पदाधिकारी अमित कासार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, परिसरातील रहिवासी एकत्र आले होते.भूमिगत वाहिन्यांचेकाम अपूर्णचम्हात्रेनगर येथे काही ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी हमरस्त्यांवर खोदकाम केले आहे. मात्र, महिना झाला तरी हे काम अपूर्ण आहे. या खड्ड्यांत पंधरवड्यापूर्वी चारचाकी वाहने, रिक्षा आदी वाहने फसली होती. त्याबाबत, पेडणेकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांकडे तक्रार केली होती. मात्र, अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही.
विजेच्या लपंडावाने डोंबिवलीकर हैराण, आठ तास वीज गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 1:19 AM