लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, गोरेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. गावात एकोपा राहावा, या भावनेतून गावकऱ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला असून, इतर अनेक ग्रामपंचायतींमध्येही अशा प्रकारे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव या ग्रामपंचायतीत नऊ सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार होते. मात्र, गावात एकोपा राहावा, यासाठी गावकऱ्यांनी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, समिया अमजद बुबेरे, निदा अक्रम बुबेरे, शकीरा तकी बुबेरे, मिझाब बुबेरे, रणजीत सोनकांबळे, मनीषा हिंदोळे, विठ्ठल वाघ, संतोष वाघ या आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, आता याबाबत औपचारिक घोषणा होणेच बाकी आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी यासीर सलीम बुबेरे, यासीर खालिद बुबेरे, नय्यर अनिस बुबेरे, मोअझम गुलजार बुबेरे, शफीक बालमिया बुबेरे, दानिश खालिद बुबेरे, शाहिद बुबेरे, मुमावर बुबेरे, सामी बुबेरे आदींनी पुढाकार घेतला होता. त्याला सर्व ग्रामस्थांनाही साथ दिल्याचे मुस्लीम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यासीर बुबेरे यांनी सांगितले. निवडणुकीच्या राजकारणातून अनेकदा एकमेकांच्या मनात कटुता निर्माण होण्याची शक्यता असते.
हे टाळण्यासाठी व गावात एकोपा टिकवून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गोरेगावातील नागरिकांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
२७ ग्रामपंचायतींसाठी ७३७ उमेदवारअंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २४७ जागांसाठी ७४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत सहा अर्ज अवैध ठरल्याने ७३७ अर्ज वैध झाले आहेत. १५ जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे असले, तरी बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासाठी सध्या ग्रामीण भागात बैठकांचे सत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ४ जानेवारी या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत अनेक ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी माघारीकडे लागले लक्ष
nमुरबाड : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यासाठी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूण ७४८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश आले आहे. nसात सदस्यसंख्या असणाऱ्या ३० ग्रामपंचायत, ९ सदस्य असणाऱ्या १३ ग्रामपंचायत व ११ सदस्य असणारी राष्ट्रीय महामार्गावरील सरळगाव ग्रामपंचायत असे ३३८ सदस्य निवडून देण्यासाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका होत असून त्यासाठी ४७ हजार २९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.