ठाणे : ठाण्याच्या खारटन रोड येथील दादोजी कोंडदेव परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या जितू शर्मा या सुरक्षारक्षकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने रविवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून या मुलीची सुखरूप सुटका करून सोमवारी तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.शर्मा याने ३१ डिसेंबर २०१७ रोजी खारटन रोड येथील नागसेननगर येथून या १६ वर्षांच्या (आता १७ वर्षे) मुलीचे लग्नाच्या आमिषाने अपहरण केले होते. याप्रकरणी १ जानेवारी २०१८ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. सलग आठ महिने या प्रकरणाचा तपास करूनही यातील आरोपी किंवा अपहृत मुलीचा शोध लागलेला नव्हता. अखेर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी २९ आॅगस्ट २०१८ रोजी हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे सोपवले. पीडित मुलगी आणि शर्मा हे मध्य प्रदेशातील सुवासरा येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाला १८ सप्टेंबर २०१८ रोजी मिळाली. याच माहितीच्या आधारे जमादार तानाजी वाघमोडे, हवालदार राजकुमार तरडे, महिला हवालदार अक्षदा साळवी आणि पोलीस नाईक वर्षा माने यांनी जितेंद्र ऊर्फ जितू शर्मा याला २३ सप्टेंबर रोजी सुवासरा येथून ताब्यात घेतले. त्याच्या अत्याचाराने सात महिन्यांची गरोदर असलेल्या या मुलीचीही त्याच्या तावडीतून त्यांनी यशस्वीपणे सुटका केली. त्याला सोमवारी ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. तर, मुलीलाही तिच्या पालकांकडे सुपूर्द केल्याचे पोलिसांनी सांगितले.नौपाड्यातील एका सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करणा-या शर्माने या मुलीला हेरल्यानंतर तिला फूस लावून तिचे अपहरण केले होते. तेव्हापासून तो या मुलीसह ठाण्यातून पसार झाला होता. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त दीपक देवराज यांनी या कामगिरीबद्दल दौंडकर यांच्या पथकाचे अभिनंदन केले. दरम्यान, शर्माविरुद्ध लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले.
आठ महिन्यांपूर्वी ठाण्यातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 9:18 PM
आठ महिन्यांपूर्वी ठाण्यातून अपहरण करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जितू शर्मा या सुरक्षारक्षकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने रविवारी अटक केली.
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरीसुरक्षा रक्षकाला अटकलैंगिक अत्याचाराचाही गुन्हा दाखल होणार