ठाणे : बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात ठाणे महापालिकेचे विद्यमान नगरअभियंता रतन अवसरमल यांच्यासह आठ अधिकाऱ्यांची तपास पथकाने गुरुवारी चौकशी केली. कॉसमॉस समूहाच्या बांधकामांना देण्यात आलेल्या परवानग्या आणि त्यांचा कालावधी याबाबत चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.परमार यांच्या कॉसमॉस ग्रुपमधील कोणत्या कामांमध्ये अनियमितता होती का? त्यामध्ये नेमकी काय अनियमितता होती? तसेच इतर बांधकामांचे नकाशे, जोता प्र्रमाणपत्रे तसेच इतर बांधकामांसंदर्भातील आवश्यक परवानग्या नाकारताना कोणती कारणे दाखविली, ती योग्य होती का? तसेच कोणत्या कारणास्तव त्या देण्यात आल्या, याबाबत नगर अभियंता रतन अवसरमल, शहर विकास विभागातील गोहिल, कार्यकारी अभियंता प्रमोद निंबाळकर, गिरीश देशमुख, नितीन येसुगडे, नितीन पवार, नेहेर, महेश रावल या अभियंत्यांची सुरज परमार यांच्या वस्तुविशारद यांच्यासमोर चौकशी केली. या वेळी अभिषेक परमार हेही उपस्थित होते. या चौकशीच्या तपशिलाची अधिकृत माहिती पोलिसांकडून मिळू शकली नाही. दोनच दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यांचे बंधू सुरेश यांच्याशी परमार यांच्या प्रकल्पात असलेली भागीदारी तसेच त्यांच्या कालावधीत त्यांच्या प्रकल्पांना मिळालेल्या परवानग्या याबाबत तपास पथकाने ही चौकशी केली होती. (प्रतिनिधी)
नगर अभियंत्यांसह आठ अधिकाऱ्यांचीही चौकशी
By admin | Published: November 21, 2015 2:53 AM