मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये ३० जूनपर्यंतच्या मागील तीन महिन्यांत कोरोना चाचण्यांची संख्या १० हजार ४२३ आणि कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्या दोन हजार ३६४ इतकी होती. परंतु, लॉकडाऊनच्या जुलैच्या अवघ्या १८ दिवसांच्या कालावधीत तब्बल आठ हजार ८७८ चाचण्या करून दोन हजार ५५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोना चाचण्या व रुग्ण बरे होण्याचे १८ दिवसांतील प्रमाण हे दिलासादायक आहे. पण, त्याचबरोबर या १८ दिवसांत तीन हजार ९६ नवे रुग्ण सापडले, तर ७४ जणांचा मृत्यू झाला.
मीरा-भार्इंदरमध्ये मार्चअखेरपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. १८ जुलैपर्यंत पालिकेने १९ हजार २०१ इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. यातील जवळपास निम्म्या आठ हजार ८७८ चाचण्या अवघ्या १ ते १८ जुलै या कालावधीत केल्या आहेत. १८ जुलैपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ४२२ तर यातून बरे झालेल्यांची संख्या चार हजार ९१९ इतकी आहे. कोरोनाने आतापर्यंत शहरात २१९ जणांचा बळी घेतला आहे. नव्याने नियुक्त केलेले आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी पदभार स्वीकारल्यापासून सर्वेक्षण, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासह रुग्णांच्या उपचारावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
मागील तीन महिन्यांत बरे होणारे रुग्ण दोन हजार ३६४ होते. परंतु, जुलैच्या १८ दिवसांत दोन हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. परंतु, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. तीन महिन्यांत १४५ रुग्णांचे मृत्यू झाले तर गेल्या १८ दिवसांत ७४ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्याही १८ दिवसांत दुप्पट झाली आहे. तीन महिन्यांत कोरोनाचे तीन हजार ३२६ रुग्ण होते. परंतु, १८ दिवसांतच तीन हजार ९६ रुग्ण सापडले आहेत. चाचण्या वाढल्या आणि चेस द व्हायरस या मुंबईच्या धर्तीवर राबवलेल्या मोहिमेमुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
प्रशासनाचे मोठे यश
च्याआधी दोन्ही शहरांत इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या, सर्वेक्षण झाले नव्हते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चाचण्या वाढवल्याने नेमके रुग्ण शोधण्यात पालिका प्रशासनाला मोठे यश आले. इतके दिवस रुग्णांचा शोध घेता येत नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.