लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात आधीच कोरोनाची दहशत आणि त्यात आता सततचा पाऊस यामुळे ठाणेसह अंबरनाथला सात जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, हिवतापाचे तब्बल आठ हजार १४४ रुग्ण या पावसाळी साथींसह जलजन्य आणि कीटकजन्य आजारांनी त्रस्त असल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची घट होऊन तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जिल्हा सध्या सज्ज झाला आहे. त्यात आधीच जूनपर्यंत डेंग्यू, हिवताप (मलेरिया) आणि चिकनगुनियाच्या साथीने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता जुलैत ठाणे शहर परिसरात सहा जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर अंबरनाथला एकाला लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे जिल्ह्यात संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, विषमज्वर या जलजन्य आणि कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले आहे.
सध्या कोरोनाच्या या कालावधीत होणारा मृत्यू हा कोरोनाचा म्हणून सर्रास बोलले जाते आहे. पण आता डॉक्टरांनी त्याकडे लक्ष केंद्रित करून साथीच्या आजारांतील डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, हिवताप, विषमज्वर या जलजन्य आजारांच्या रुग्णांचे वर्गीकरण हाती घेतले आहे. सिव्हिल रुग्णालयात आलेल्या ७५२ रुग्णांच्या तपासणीत दोन मलेरियाच्या व सहा डेंग्यूच्या रुग्णांचा शोध नुकताच घेतला आहे. या शहरात आतापर्यंत सात हजार १३७ रुग्णांची अल्पावधीत तपासणी झाली. त्यातून चार हिवतापासह १२२ डेंग्यू च्या रुग्णांचा शोध लागलेला आहे. तर चिकनगुनियाचे आठ रुग्ण सापडले आहेत. याशिवाय अंबरनाथला तीन हजार ५६ रुग्णांमधून पाच विषमज्वर आणि एक डेंग्यू रुग्ण आढळला आहे. याशिवाय या शहरात आतापर्यंत १८ अतिसारच्या रुग्णांसह १७ हगवणीचे, २९ कावीळ आणि ३९ विषमज्वराच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
----------