ठाणे: आजही एकलव्य मातांनी आपल्या मुली - मुलांना स्वतःच्या विकासासोबतच सामाजिक भान जोपासण्याची शिकवण देणे आवश्यक आहे. नागरिकांनी साने गुरुजींपासून प्रेरणा घेऊन सध्यस्थितीत योग्य बदल घडवून आणण्यासाठी झटण्याचे आवाहन यावेळी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे संजय मंगला गोपाळ यांनी केले. यावेळी प्रतिकूल परिस्थितीत जसे साने गुरूजींना त्यांच्या आईने घडवले तसेच आजच्या अधिक प्रतिकूल परिस्थितीत, ठाण्यातील एकलव्य विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील एकलव्यांच्या माता आपल्या मुलांना घडवत आहेत. यामुळे अशा माता - महिलांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त समता विचार प्रसारक संस्था आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ हा नव्या चित्रपटाचा प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला. त्याच वेळी एकलव्य माता सन्मान हा एकलव्य मुलांना सर्व प्रकारे प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या मातांच्या सन्मानाचा कार्यक्रमही संपन्न झाला. समता विचार प्रसारक संस्था दर वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या एकलव्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या त्यांच्या मातांचे महत्त्व जाणून त्यांचे सत्कार करते.
यावर्षी, भानू संजय दाठिया,जान्हवी हेमंत पोतदार, मनिषा संजय करांडे, रेणुका टोकरे, कमलादेवी साऊद, मंगल चंदनशिवे, नैना हांडवे, बिंबला मेहता, रुक्मिणी पाटील, वैजयंती गोरिवले, समिता जयस्वाल, रेखा महेश गुरव, सुनीता बेर्डे या मातांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. तुडुंब भरलेल्या सभागृहात महिला, पुरुष, युवा यांच्याबरोबर सर्व वयोगटातील लहान आणि किशोरवयीन मुलांनीही संपूर्ण चित्रपट शांततेत समरसून बघितला. नंतर याबद्दल चर्चा करताना त्यांना भावलेल्या गोष्टी आवर्जून सांगितल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम प्रभात चित्र मंडळाचे संतोष पाठारे, समता विचार प्रसारक संस्थेचे अजय भोसले, जगदीश खैरालिया, मनीषा जोशी, लतिका सु. मो. आदी उपस्थित होते.